अहमदाबाद : देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाची एनडीए आघाडी, तर विरोधकांची 'इंडिया' आघाडी एकमेकांविरोधात लढणार आहेत. भाजपा गेल्या 10 वर्षांपासून गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागा जिंकत आहे. त्यामुळे आता राज्यात पक्षाला टक्कर देण्यासाठी आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष इशुदान गढवी यांनी तसे संकेत दिले आहेत.
'युतीची चर्चा प्राथमिक टप्प्यावर आहे' : 'आप आणि काँग्रेस हे दोघेही 'इंडिया' आघाडीचे भाग आहेत. हा फॉर्मुला गुजरातमध्येही राबवला जाणार आहे. युतीची चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यावर असली तरी, गुजरातमधील आगामी लोकसभा निवडणुका आप आणि काँग्रेस दोन्ही जागा वाटपाच्या सूत्रानुसार लढतील हे निश्चित आहे', असे इशुदान गढवी म्हणाले. 'जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भाजप यावेळी गुजरातमधील सर्व 26 जागा जिंकू शकणार नाही, असे त्यांनी नमूद केले. 'अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप' भाजपाचा पराभव करण्यासाठी 'इंडिया' आघाडीत सामील झाला आहे. आपच्या गुजरात युनिटने पक्ष कोणत्या जागांवर उमेदवार उभे करू शकतो यावर आधीच संशोधन सुरू केले आहे', असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची सावध प्रतिक्रिया : गढवी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने, 'पक्ष केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनांचे पालन करेल', असे म्हटले. 'अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाला घ्यायचा आहे. मी नुकतेच त्यांच्या घोषणेबद्दल ऐकले. इतर पक्षांसोबत जागावाटपाचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेतो. निवडणूकपूर्व युतीचा निर्णय घेणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. केंद्रीय नेतृत्वाने हा मुद्दा उपस्थित केल्यावर राज्य नेतृत्व त्यावर चर्चा करेल', असे गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच या संदर्भात गुजरात काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या निर्णयाचे पालन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही कोणत्याही युतीला घाबरत नाही - भाजप : इशुदान गढवी यांच्या या वक्तव्याला भाजपने मात्र विशेष महत्त्व दिलेले नाही. 'गेल्या दोन टर्मपासून आम्ही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागा जिंकत आहोत. यावेळी सर्व जागा पाच लाख मतांच्या फरकाने जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अशा कोणत्याही युतीला घाबरत नाही. निवडणूक जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे', असे भाजपाच्या गुजरात युनिटचे प्रवक्ते रुतविज पटेल म्हणाले.
हेही वाचा :