हैदराबाद Five Month Boy Died in Dog Attack : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आणखी एका बाळाला जीव गमवावा लागला आहे. या महिन्याच्या 8 तारखेला कुत्र्याच्या हल्ल्यात 5 महिन्यांचं बाळ गंभीर जखमी झालं होतं. रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झालाय.
हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला : हैदराबादमध्ये अनेक भटकी कुत्री मोकाट फिरत असल्याचं दिसून येतंय. शहरातील अनेक रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचे थवे फरत असल्याचं दिसतात. कोणी बॅग किंवा खाण्याचे पदार्थ घेऊन जात असल्यास ही भटकी कुत्री त्यांच्या मागं धावतात. शहरातील या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला दुचाकीवरून येणारे-जाणारे लोकंही घाबरले आहेत. तसंच लहान मुलं एकटे दिसल्यावर कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू : डिसेंबर महिन्याच्या ८ तारखेला शेकेपेठ येथील विनोबानगर येथे घरात झोपलेल्या ५ महिन्यांच्या बाळावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात हे बाळ गंभीर जखमी झालं होतं. याबाबत माहिती मिळताच बाळाच्या पालकांनी त्याला तत्काळ उस्मानिया रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी या बाळाचा मृत्यू झालाय.
उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजी आणि अनुषा विनोबानगरमध्ये राहतात. डिसेंबर महिन्याच्या 8 तारखेला ते आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घरी झोपवून कामानिमित्तानं बाहेर गेले होते. दरम्यान, याचवेळी भटक्या कुत्र्यांनी तेथे येऊन बाळावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. बाळाचे आई-वडील आले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बाळ दिसलं. त्यांनी तत्काळ बाळाला एका खासगी रुग्णालयात नेलं. तेथून निलोफर आणि नंतर उस्मानिया रुग्णालयात बाळाला नेण्यात आलं, तेथे रविवारी उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांची तक्रार दाखल करून तपास करण्यात येत आहे. कुत्र्यांनी मुलावर हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -