धुबरी (आसम) - आसामच्या धुबरी जिल्ह्यात आज गुरुवार (दि. 29 सप्टेंबर)रोजी ब्रह्मपुत्रा नदीत बोट उलटल्याने एक सरकारी अधिकाऱ्यासह शालेय विद्यार्थी आणि बोर्डावरील अनेक जण बेपत्ता झाले आहेत. (boat sank in the Brahmaputra river) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या बोटीत सुमारे शंभर प्रवासी होते. त्यावर 10 मोटारसायकलीही होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. ही बोट भाशनीकडे जात असताना धुबरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या अदबारी येथे पुलाच्या खांबाला धडकली आणि ती उलटली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
काही भागात सर्वेक्षण - आतापर्यंत या बोटीतून 15 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. त्यांनी सांगितले की अनेक शाळकरी मुले देखील बोटीवर होते. धुबरी सर्कल ऑफिसर संजू दास, जमीन दस्तऐवज अधिकारी आणि एक कार्यालयीन कर्मचारी देखील बोटीवर होते. काही भागात सर्वेक्षण करण्यासाठी ते जात होते.
जलतरणपटूंचीही मदत - दास यांचा शोध घेता आला नाही तर इतर दोन व्यक्ती पोहून सुखरूप बाहेर आले आहेत. स्थानिक लोकांनी त्यांच्या बोटीने बचावकार्य सुरू केले. गुवाहाटीतील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जलतरणपटूंचीही मदत घेतली जात आहे.