हमीरपूर (हिमाचल प्रदेश) 67 Year Old Runner : असं म्हणतात की ६० वर्षांनंतर सर्वसाधारण माणसाचं शरीर थकतं. त्यानंतर कोणाचीही आराम करण्याची इच्छा असते. मात्र हिमाचलच्या एका धावपटूला ही बाब लागू होत नाही. या धावपटूनं चक्क वयाच्या ६७ व्या वर्षी डझनभर पदकं जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
मलेशिया ओपन मास्टर्स स्पर्धेत तीन पदकं जिंकली : हमीरपूरच्या सुरेंद्र सिंह यांनी अलीकडेच १६ आणि १७ सप्टेंबर रोजी झालेल्या मलेशिया ओपन मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन पदकं जिंकली. या वयातही त्यांनी ५ किलोमीटरपासून ५० किलोमीटरपर्यंतच्या शर्यतींमध्ये भाग घेतला होता. सुरेंद्र सिंह यांनी मलेशिया ओपन मास्टर्स अॅथलेटिक स्पर्धेत ८०० मीटरमध्ये कांस्यपदक तर १५०० मीटर आणि ३००० मीटरमध्ये रौप्य पदक जिंकलं
कुठे किती पदकं जिंकली : सुरेंद्र सिंह यांनी ७ वेळा नॅशनल ओपन मास्टर्समध्ये भाग घेतला आहे. तेथे त्यानं ८ सुवर्ण, ३ रौप्य पदकं जिंकली. यासह त्यानं या वर्षी मलेशियामध्ये झालेल्या मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये २ रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत. २०२३ मध्ये त्यानं एक रौप्य आणि कांस्य तर थायलंडमध्ये १५०० मीटर शर्यतीत एक रौप्य पदक जिंकलं. सुरेंद्र सिंहने चेन्नई, बंगळुरू, कलकत्ता, पटियाला यासह गुजरात आणि मणिपूर या राज्यांमध्ये मास्टर्स अॅथलीट म्हणून आपली प्रतिभा दाखवली आहे.
वयाच्या ४५ व्या वर्षी धावणं सुरू केलं : धावपटू सुरेंद्र सिंह यांनी सांगितलं की त्यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी धावणं सुरू केलं. त्यानंतर हळूहळू छंद म्हणून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शर्यतींमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये डझनभर पदकं जिंकली आहेत. आता त्यांचं ध्येय युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचं आहे.
१७ वर्षं सैन्यात सेवा दिली : वयाच्या ६७ व्या वर्षीही सुरेंद्र सिंह फार तंदुरुस्त आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या आधी १७ वर्षं सैन्यात सेवा दिली होती. ते दररोज सकाळ संध्याकाळ सराव करतात. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी आपला धावण्याचा छंद जोपासला होता. सुरेंद्र सिंह यांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला दिलंय. मुलांना ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला देत कठोर परिश्रमातूनच खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :