इंदूर (मध्य प्रदेश) Child Heart Attack : पूर्वी हृदयविकारासारखे आजार फक्त वृद्धांनाच होत असत. परंतु आता बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार हळूहळू तरुण आणि लहान मुलांनाही होतो आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली. येथे एका ६ वर्षाच्या बालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे.
उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका : झालं असं की, शनिवारी (२५ नोव्हेंबर) इंदूरच्या डेली कॉलेज स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकणाऱ्या वेहान जैनची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे उपचारादरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील राहुल जैन यांनी ही माहिती दिली.
'मायोकार्डिटिस' मुळे मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, वेहानला काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडल्यानं त्याला इंदूर येथील डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं. तेव्हा त्याला व्हायरल फिव्हर असल्याचं उघड झालं. शनिवारी सायंकाळी त्याची प्रकृती आणखी खालावली. रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी 'मायोकार्डिटिस' हे मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये हृदयाचं पंपिंग क्षीण होतं. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे.
मायोकार्डिटिस म्हणजे काय : 'मायोकार्डिटिस' किंवा 'मायोकार्डियम'मुळे हृदयाच्या स्नायूंवर सूज येते. त्यामुळे छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा येणं, डोकेदुखी, ताप किंवा घसा खवखवणं अशी लक्षणं जाणवतात. मायोकार्डिटिसमुळे रक्त पंप करण्याची क्षमता देखील प्रभावित होते. हृदयातील गुठळ्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. या परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हेही वाचा :