मुंबई - कोरोना काळात जीवाची पर्वा न करता देशभरातील खासगी डॉक्टरही रुग्णसेवा देत आहेत. या दरम्यान मोठ्या संख्येने खासगी डॉक्टर कोरोना बाधित होत असून त्यात मोठ्या संख्येने डॉक्टर मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र पहिल्या लाटेत पाहायला मिळाले. तर दुसऱ्या लाटेतही मोठ्या संख्येने खासगी डॉक्टर कोरोनाचे बळी ठरले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने नुकतीच यासंबधीची राज्यनिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारी नुसार देशभरातील 594 डॉक्टरांचा बळी दुसऱ्या लाटेत गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यात महाराष्ट्रातील 17 डॉक्टरांचा समावेश आहे.
कोरोनामुळे दगावलेल्या डॉक्टरांपैकी सर्वाधिक डॉक्टर हे दिल्लीतील आहेत. दिल्लीतील 107 खाजगी डॉक्टर कोरोनाचे शिकार ठरले आहेत. ही बाब सगळ्यांचीच चिंता वाढवणारी आहे.
1300 डॉक्टरांचा कोरोनाने घेतला बळी -
मार्च 2020 पासून सरकारी आणि खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. यादरम्यान हे डॉक्टर कोरोना ग्रस्त होत असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यानुसार आतापर्यंत एप्रिल 2020 ते मे 2021 दरम्यान देशभरातील अंदाजे 1300 डॉक्टर कोरोनामुळे दगावले असल्याची माहिती डॉ रामकृष्ण लोंढे, अध्यक्ष आयएमए महाराष्ट्र यांनी दिली आहे.
पहिल्या लाटेत 700 ते 800 दरम्यान डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर दुसऱ्या लाटेत अगदी तीन महिन्याच्या काळात 594 खासगी डॉक्टर कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. ही बाब चिंताजनक असल्याचे डॉ लोंढे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर यात दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीतील तब्बल 107 डॉक्टरांचा जीव दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे गेला आहे. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 96 डॉक्टर कोरोनाने दगावले आहेत. महाराष्ट्रातील 17 डॉक्टर कोरोनाचे शिकार झाले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 67, राजस्थानमधील 43, उत्तराखंडमधील 39, गुजरातमधील 31, तेलंगणातील 32 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना योध्यांवर हल्ले -
कोरोना योध्यांप्रति सहानुभूती व्यक्त करण्याची गरज असताना देशभरात कोरोना योध्यावर हल्ले केले जात आहेत, असे म्हणत आयएमएने यावर नाराजी व्यक्त केली. तसेच खासगी डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याची मागणी ही केली. सरकारी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यु झाला असेल तर त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये केंद्र सरकारकडून दिले जात आहेत. पण मृत खासगी डॉक्टरांच्या कुटुंबाला याचा लाभ मिळत नाही. कारण त्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. खागसी डॉक्टरांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी आयएमएची मागणी आहे. पण केंद्र सरकार वर्षभरापासून याकडे कानाडोळा करत आहे. तेव्हा दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे दगावलेल्या खासगी डॉक्टरांचा आकडा पाहता त्यांना ही 50 लाख विमा द्यावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.