लखनऊ - उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यात विषारी मद्यपान केल्यामुळे आतापर्यंत 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी 17 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जेएन मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा दंडाधिकारी चंद्र भुषण सिंग यांनी आतापर्यंत 25 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
गुरुवारी रात्री देशी दारूचे मद्यपान करून अनेक जण आजारी पडल्यानंतर मृत्यूची मालिका सुरू झाली. अलिगढ जिल्ह्यातील ठाना लोधा, खैर, जवां, टप्पल, पिसावा या भागातील नागरिकांनी ही विषारू दारू खरेदी केली होती.
कडक कारवाईचे मुख्यमंत्री योगींचे निर्देश -
या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत चार दारू दुकाने सील करण्यात आली असल्याचे जिल्हा दंडाधिकारी चंद्र भूषण सिंह यांनी सांगितले. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे. येत्या 15 दिवसांत अहवाल सादर केला जाईल.
इतर राज्यातील विषारी दारू प्रकरण -
पंजाब, मध्य प्रदेश, आसाममध्ये विषारी दारू प्यायल्याने मद्यपींचा मूत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मध्य प्रदेशात विषारी दारूने 20 जणांचा बळी घेतला होता. तर पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने 104 जणांचा मृत्यू झाला होता. आसामच्या गोलाघाट आणि जोराहात जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 83 लोकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - मध्य प्रदेशात विषारी दारूचे २० बळी, अनेकांची प्रकृती चिंताजनक