चंदीगढ : हरियाणाच्या करनालमध्ये असणाऱ्या एका सैनिक स्कूलमधील तब्बल ५४ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली असून, आरोग्य विभागाचे एक पथक या शाळेत दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करनालच्या कुंजपूरा गावात हे सैनिक स्कूल आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या मुलांमध्ये दहावी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी याबाबत करनालचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, की करनालमधील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती. मात्र शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर पुन्हा रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली.
ते पुढे म्हणाले, की काल (सोमवार) सैनिक स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने शाळेतील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी केली. यामधील ५४ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यावेळी बोलताना शर्मा यांनी लोकांना काळजी घेण्याचे आवाहनही केले. कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : पश्चिम बंगालच्या सर्व जिल्ह्यांमधून मोदींच्या प्रचारयात्रा; आसामच्या ३३ जिल्ह्यांमध्येही फिरणार..