भुवनेश्वर (ओडिशा) : ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांच्या अकाली निधनाने ओडिशावर शोककळा पसरली आहे. दिवंगत नेत्याच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. रविवार 29 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत दुखवटा पाळण्यात येणार आहे. नाबांच्या स्मरणार्थ राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, असे सांगण्यात आले आहे. पुढील ३ दिवस शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. झारसुगुडा येथे आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नाबांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार राष्ट्रीय सन्मानाने केले जातील.
पोलिस एएसआयने झाडल्या गोळ्या : आज सकाळी 8 वाजता त्यांचे पार्थिव बिजू जनता दलाच्या कार्यालयात नेण्यात येणार असून तेथे पक्षाचे कार्यकर्ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर 9 वाजता मृतदेह विशेष हेलिकॉप्टरने झारसुगुडा येथे नेण्यात येईल. पार्थिव नाबा दास यांच्या गावी पोहोचल्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होईल. झारसुगुडा येथील ब्रजराजनगर येथील गांधी चौकात रविवारी दुपारी बाराच्या सुमारास नाबा दास यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एका स्थानिक पोलिस एएसआयने त्यांच्यावर हा हल्ला केला होता. नाबांना गंभीर अवस्थेत प्रथम झारसुगुडा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आल. तेथे त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक प्रयत्न करूनही नाबांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. अखेर काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शवविच्छेदनाचा व्हिडिओ-ग्राफ करण्यात आला : रविवारी सायंकाळी नाबा दास यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कॅपिटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. दोन व्यक्तींच्या वैद्यकीय पथकाने शवविच्छेदन करत शवविच्छेदनाची व्हिडिओ शूटिंग केली आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेचे कर्मचारीही घटनास्थळी हजर होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह विधानसभेच्या आवारात आणण्यात आला. येथे सभापती विक्रम केशरी आरुख, उपसभापती रजनीकांत सिंह, मंत्री आणि आमदारांनी श्रद्धांजली वाहिली. येथून रात्री नाबाच्या भुवनेश्वर येथील शासकीय निवासस्थानी मृतदेह नेण्यात आला. त्यांचे मित्रपक्ष व समर्थकांनी तेथे त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
प्रकरणाचा तपास सुरू : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत बोलताना ब्रजराजनगरचे एसडीपीओ गुप्तेश्वर भोई यांनी रविवारी सांगितले की, या कृत्यात एक सहायक उपनिरीक्षक सहभागी होता. गोपाल दास नावाचा सहाय्यक उपनिरीक्षक गांधी चक येथे तैनात होता. त्याने मंत्री नाबा दास यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. भोई यांच्या म्हणण्यानुसार एएसआयने मंत्र्यांवर गोळीबार का केला याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.