पणजी (गोवा) - कोरोनाने गोवा राज्यातही मोठी हानी पोहोचवली आहे. राज्यात कोरोनाने २५ मे २०२१ पर्यंत २,४६० जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६१.४२ टक्के मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचे झाले आहेत. ६६.५० टक्के मृत्यू पुरुषांचे झाले आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी ७५.६९ टक्के रुग्ण हे कोमोर्बिड अर्थात अन्य आजाराने त्रस्त होते. ४०.८५ टक्के मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच किंवा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीन दिवसांत झाले आहेत. अशी माहिती गोवा सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात सर्वाधिक बाधित आणि मृत्यू १ ते २५ मेपर्यंत
राज्यात २५ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. २२ जून २०२० रोजी पहिले तीन बळी गेले होते. त्या दिवसापासून २४ मे २०२१ पर्यंत १,४९,४१० कोरोनाबाधित सापडले आहेत. यांतील १,३१,२४४ रुग्ण बरे झाले आहेत. २२ जून ते २४ मे २०२१ पर्यंत २,४६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सर्वाधिक बाधित तसेच मृत्यू १ ते २५ मेपर्यंत झाले आहेत. या कालावधीत ३९.०५ टक्के म्हणजे ५८,३५८ जण करोनाबाधित झाले आहेत. याच कालावधीत ४८.९९ टक्के म्हणजे ६४,३०५ रुग्ण बरे झाले आहेत. याव्यतिरिक्त मागील २५ दिवसांत एकूण मृत्यूंपैकी ५२.५२ टक्के म्हणजे १,२९२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मे महिना सर्वांत वाईट महिना ठरला आहे. राज्यातील वाढती बाधितांची संख्या तसेच मृत्यूची दखल घेऊन सरकारने नाईट कर्फ्यू, तसेच कोरोना निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही बाधितांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे.
सर्वाधिक मृत्यू मागील २५ दिवसांत ७४६ जणांचे झाले
राज्यात २५ मेपर्यंत २,४६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२ जून २०२० रोजी ८५ वर्षीय रुग्णाचा पहिला मृत्यू झाला होता. एकूण मृत्यूंपैकी ६१.४२ टक्के म्हणजे १,५११ मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचे झाले आहेत. या सर्वाधिक मृत्यू मागील २५ दिवसांत ७४६ जणांचे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत सहा लहान मुलांचे करोनामुळे मृत्यू झाले आहेत. यात २० ऑकटोबर २०२० रोजी तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू सर्वांत कमी वयातील मृत्यू ठरला आहे. जुलै २०२० मध्ये १, आक्टोबर २०२० तीन, मार्च २०२१ आणि मे २०२१ मध्ये प्रत्येकी एका लहान बाळाचा मृत्यू झाला आहे.
एकूण मृत्यूंपैकी १,६३६ मृत्यू पुरुषांचे
एकूण मृत्यूंपैकी ६६.५० टक्के म्हणजे १,६३६ मृत्यू पुरुषांचे झाले आहेत. ३३.५० टक्के म्हणजे ८२४ महिला रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. याशिवाय वरील कालावधीत १०९ रुग्णांचे मृत्यू इस्पितळात दाखल होण्याआधीच झाले होते. ५३६ रुग्ण इस्पितळात दाखल झाल्यानंतर २४ तासांत मृत्यू झाले होते. १७ रुग्णांचा इस्पितळात दाखल केल्यानंतर दोन दिवसांत, तर १६३ रुग्णांचा तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यापैकी १२ रुग्ण अज्ञात असून त्यांची ओळख पटलेली नाही. त्यांचे मृतदेह शवागारात ठेवले आहेत. एकूण मृत्यूंपैकी ७५.६९ टक्के म्हणजे १,८३४ रुग्णांना अन्य आजार म्हणजे ते कोमोर्बिड होते. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - सीबीआय प्रमुखपदी सुबोध कुमार जैस्वाल, राज्यातील 'हे' नेते येऊ शकतात अडचणीत