पोरबंदर ( गुजरात )- पाकिस्तानने २० भरतीय मच्छिमारांना कराची येथील कारागृहात बंद केले होते. बेकायदेशीरपणे त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला, असा आरोप त्यांच्यावर होता. त्या २० मच्छिमारांची सुटका करण्यात आली असून त्यांना आज (दि. २४ जानेवारी) वाघा बॉर्डरवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. यामुळे त्या मच्छिमारांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
भारत व पाकिस्तान दोन्ही देशांकडून अनेकदा मच्छिमारांना ताब्यात घेण्यात येते. समुद्राच्या पाण्यात आंतरराष्ट्रीय सीमेचे अंदाज येत नसल्याने भारताचे मच्छिमार पाकिस्तानच्या सीमेत तर पाकिस्तानचे मच्छिमार भारताच्या सीमेत प्रवेश करतात. यामुळे सतत अडचणीत येत असतात. अशाच प्रकारे भारतातील २० मच्छिमार नकळत पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. त्यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेऊन कराची येथील कारागृहात ठेवले होते.
वीस मच्छिमारांपैकी पाच मच्छिमार हे उत्तर प्रदेश राज्यातील असून उर्वरित १५ मच्छिमार हे गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील आहेत. चुकून एकमेकांच्या देशात प्रवेश करणाऱ्या मच्छिमारांना चुकीच्या पद्धतीने समुद्रात अडकवले जाणार नाही किंवा तुरुंगात डांबले जाणार नाही, यासाठी योग्य ती पावले उचलतील, अशी आशा दोन्ही देशांतील मच्छिमारांना आहे.