नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमली पदार्थ तस्करी प्रकरणी तीन आफ्रिकी नागरिकांना अटक केली. यामध्ये युगांडाच्या दोन महिला आणि एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांकडून हेरॉईन आणि कोकेन असे नऊ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला या चुलत बहिणी आहेत. जॅस्केंट नाकालुंगी (४२) आणि शरीफा नामागंडा (२८) यांना दिल्ली पोलिसांनी २८ जानेवारीला अटक करण्यात आली होती. या दोघींकडे शरीफाच्या उपचारांसाठी मेडिकल व्हिसा होता, ज्याच्या सहाय्याने त्या भारतात आल्या होत्या. एजन्सीला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन या दोघींना अटक करण्यात आली होती. या दोघींकडून ८ किलो हेरॉईन आणि एक किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. युगांडामधून येताना त्यांना हे अमली पदार्थ देण्यात आले होते, अशी माहिती एनसीबीचे उपसंचालक के. पी. एस. मल्होत्रा यांनी दिली.
यासोबतच या दोघींनी दिलेल्या माहितीनुसार, किंग्स्ले नावाच्या एका नायजेरियन व्यक्तीलाही अटक केली आहे. दक्षिण अमेरिकी देशांमधून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यात किंग्ल्सेचा सहभाग होता. तसेच, या तिघांकडून जप्त करण्यात आलेले, आणि इतर काही छाप्यांमध्ये मिळालेले अमली पदार्थ आफ्रिकेतून आल्याचे समोर आले आहे असेही मल्होत्रा यांनी सांगितले.
हेही वाचा : भारत-इस्रायल द्विपक्षीय संबंध कुणालातरी आवडत नसावेत - इस्रायली राजदूत