हैदराबाद : देशभरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी बिर्याणीचा आस्वाद घेतला. 31 डिसेंबरच्या रात्री बिर्यानीसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्राप्त झाल्या. आश्चर्याचे म्हणजे, हैदराबादमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटने शनिवारी रात्री तब्बल 15,000 किलो बिर्याणी बनवली! तसेच या रेस्टॉरंटने या काळात मिनिटाला दोन बिर्याणींची डिलीवरी केली! (Hyderabadi Biryani) (2 plates of Hyderabadi Biryani sold every minute).
देशभरात बिर्याणीच्या 3.50 लाख ऑर्डर : याचा खुलासा करताना फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने सांगितले की, हैदराबादी बिर्याणीसाठी देशभरात मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यात आल्या होत्या. ट्विटरवर केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार, 75.4% ऑर्डर हैदराबादी बिर्याणीच्या आल्या आहेत. त्यानंतर लखनौ बिर्याणी (14.2%) आणि कोलकाता बिर्याणी (10.4%) चा नंबर लागतो. देशभरात सर्वाधिक डिलिव्हरी होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीत बिर्याणी अव्वल आहे. शनिवारी रात्री 10.25 वाजेपर्यंत स्विगीने देशभरात बिर्याणीच्या 3.50 लाख ऑर्डर दिल्या होत्या. बिर्याणीपाठोपाठ पिझ्झा आणि चिप्सच्या पाकिटांनाही मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत.