नवी दिल्ली - अनेकदा सांगूनही सलून आणि पॉर्लर यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हेअरकट करुन दिला जात नाही. वेगळ्या प्रकारचा हेअरकट करुन दिल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय इतरांसमोर वागताना शरमेने मान खाली होते. पण नुकतीच एक घटना अशी घडली आहे, ती वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चुकीच्या पद्धतीने केस कापल्याने सलूनला तब्बल 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.
'म्हणून' ठोठावला दंड -
राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोगाने (NCDRC) चुकीच्या पद्धतीनं केस कापणाऱ्या सलूनला तब्बल 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई बजावली आहे. असा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या ग्राहकाला कशी नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे. चुकीच्या पद्धतीने केस कापल्याने आणि केसांना कायमस्वरुपी नुकसान पोहोचवल्याने असा प्रचंड दंड ठोठावण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण -
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका हॉटेलमध्ये हा सलून आहे. आशना रॉय नावाची तरुणी एप्रिल 2018 मध्ये केसांच्या उपचारासाठी तेथे गेली होती. 'हेअर प्रॉडक्ट्स'ची ती मॉडेलिंग करायची. तिने अनेक मोठ्या हेअर-केअर ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. या क्षेत्रात तिला नाव कमवायचे होते. परंतु सलूनने तिच्या सूचना नीट न ऐकता केस कापल्याने तिला मॉडेलिंगचे काम गमवावे लागले. प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. या एका घडामोडीने केवळ तिचे आयुष्य बदलले नाही तर मॉडेल बनण्याचे स्वप्नही भंगले. चुकीचे केस कापल्याने तिच्या पदरी निराशा पडली.
आशना रॉयने सांगितले, की मी अतिशय स्पष्ट सांगितले होते की समोरून लांब फ्लिक्स आणि मागून चार इंच केस कापा. पण हेयरड्रेसरने स्वतःच्या मनाने फक्त चार इंच केस सोडून लांब केस कापले. माझ्या सूचना हेयरड्रेसरने पाळल्या नाहीत. या प्रकरणी तिने तक्रार केली तेव्हा तिने फ्री हेअर ट्रीटमेंट असल्याचे सांगितले. याची काहीही कल्पना आशनाला देण्यात आली नव्हती. हे सर्वस्वी चुकीचे होते.
आशनाने दावा केला आहे की, केमिकलमुळे तिच्या केसांना कायमचे नुकसान झाले. केसांवर लगेच ट्रिटमेंट करणे शक्य नव्हते. प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याने तिने हे संपूर्ण प्रकरण NCDRC कडे नेले. तिने प्रत्यक्षात तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. पण, तिला 2 कोटी रुपयांचीच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. येत्या दोन महिन्यात ही रक्कम आशनाला मिळावी असा आदेश देण्यात आला आहे.
हेही - धक्कादायक! दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच गोळीबार; कुख्यात गुन्हेगारासह तिघांचा मृत्यू