तिरुवनंतपुरम (केरळ) - कोरोनाच्या संकटानंतर केरळला झिका या विषाणुजन्य रोगाचा सामना करावा लागत आहे. झिकाचा पहिला रुग्ण गुरुवारी आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी झिकाचे १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे केरळमध्ये झिका रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांना झिकाची लागण झाली आहे.
तिरुवनंतपुरम येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेला गुरुवारी झिकाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर १४ नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलीजीला पाठविले होते. हे अहवालानुसार १४ जणांना झिकाची लागण झाल्याचे निदान स्पष्ट झाले आहे. पारसाला येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे.
महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू-
झिकाची लागण झालेल्या महिलेवर तिरुवनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेला ताप, डोकेदुखीचा त्रास होत असल्याने २८ जुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संशयित महिलेने ७ जुलैला मुलीला जन्म दिला होता.
ही आहेत लक्षणे-
- ताप आणि अंगावर लाल फोड येणे, स्न्यायू दुखणे, सांधे दुखी आणि डोके दुखी हे झिकाची लक्षणे आहेत.
- झिका हा एड्स या डासामुळे होतो. डास दिवसभरातून एकदाच मानवाला चावतो.
- रोगाची लक्षणे दोन ते सात दिवस राहतात.
- झिकाची लक्षणे दिसण्यासाठी तीन ते १४ दिवस लागतात. तर बहुतांश रुग्णांमध्ये झिकाची लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत.
- या विषाणुमुळे रोगी व्यक्तीचा क्वचित मृत्यू होतो.
हेही वाचा-NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे
अशी होते चाचणी-
- रोगाच्या चाचणीचे केंद्र दिल्लीतील एनसीडीसी आणि पुण्याती एनआयव्हीमध्ये आहे.
- साधारणत: आरटीपीसीआर चाचणी केली जाते.
अशी घ्या काळजी-
- डास चावण्यापासून बचाव करणे हा झिकापासून लागण टाळण्याचा मुख्य मार्ग आहे.
- सध्या, झिकावर उपचार उपलब्ध नाहीत.
- गर्भवती महिला, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, केरळच्या आरोग्य मंत्रालयाने सर्व जिल्ह्यांत झिका व्हायरस अलर्ट जारी केला आहे.