इंदौर - पब-जी गेम खेळण्याच्या लोभापायी लहान मुलांसह तरुणांना जीव गमवावा लागल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. इंदौरच्या तुकोगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वल्लभनगर येथे एक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला PUB-G गेमचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला - तुकोगंज पोलीस स्टेशन हद्दीतील वल्लभ नगरमध्ये राहणारा १८ वर्षीय विवेक हा १२वीचा विद्यार्थी होता. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी आले असता त्यांना तो फासावर लटकत असल्याचे दिसले. यावेळी तो नग्नावस्थेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोबाईल जप्त - पोलिसांनी सांगितले की, विवेकला PUB-G गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. अनेकवेळा त्याला पबजी गेम खेळण्यासही मनाई करण्यात आली होती. त्याने कोणाचेच ऐकले नाही. बहुधा या खेळामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. इंदूरच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.