नवी दिल्ली - अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे भारतातील मुंबईसह 12 शहरं पाण्यात बुडणार असल्याचा धक्कादायक रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालानुसार भविष्यात लोकांना उष्णतेचा खूप जास्त सामना करावा लागू शकतो. 80 वर्षांनंतर म्हणजेच 2100 पर्यंतचे भारताचे चित्र या अहवालात दर्शवण्यात आले आहे. भारतीय किनारपट्टीवर असलेल्या शहरांना याचा फटका बसणार आहे.
भारताच्या ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किद्रोपूर किनारपट्टी या शहरांमधील पाणी पातळी येत्या दहा वर्षांमध्ये दोन ते सात इंचांनी, तर येत्या 80 वर्षांमध्ये सुमारे तीन फुटांनी वाढेल. ही शहरे व्यापाराच्या दृष्टिनं महत्त्वाची आहेत. तसंच या शहरांमधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आयपीसीसीचा इशारा गंभीर समजला जातो आहे. अशा स्थितीत या भागात राहणाऱ्या लोकांना भविष्यात ही जागा सोडावी लागू शकते.
अमेरिकी अंतराळ संस्था नासा (NASA) आणि इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजने(IPCC) जारी केलेल्या अहवालानुसार वर्ष 2100 पर्यंत जगाच्या तापमानामध्ये 4.4 डिग्री (World temperature in 2100) सेल्सिअसने वाढ होईल. यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरील बर्फ वितळून जगातील अनेक ठिकाणची जमीन पाण्याखाली जाईल. यामध्ये भारतातील समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या 12 शहरांचा समावेश आहे. शहरे 3 फुटांपर्यंत पाण्यात बुडतील, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
वेगाने पारा वाढला तर मोठा विनाश -
नासाच्या सी लेव्हल प्रोजेक्शन टूलमध्ये (Sea level projection tool) जगाचा नकाशा दिसतो. कोणत्या वर्षी जगातील कोणत्या भागातील समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, हे त्या नकाशात दाखवण्यात आले आहे. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण थांबवले नाही तर तापमान सरासरी 4.4 डिग्री सेल्सियसने वाढेल. पुढील दोन दशकात तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढ होईल. या वेगाने जर पारा वाढला तर हिमनद्या वितळतील आणि मोठा विनाश होईल.
हेही वाचा - हवामानातील बदल हाच धोक्याचा इशारा...
हेही वाचा - सावधान! ...तर तीन अंशांनी वाढणार जागतिक तापमान! संशोधकांनी दिला इशारा
हेही वाचा - मानवतेसाठी धोक्याचा "कोड रेड"; हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळणे अशक्य असल्याचा संयुक्त राष्ट्राचा इशारा