नवी दिल्ली - देशभरातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी सध्यस्थितीची माहिती आणि लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार वाढत असून येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान लसीकरण उत्सव साजरा करा असे मोदी म्हणाले.
कोरोना संक्रमण वेगाने होत असून हा चिंतेचा विषय आहे. पूर्वीपेक्षा आता लोक बेजबाबदार झाले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्र , छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांनी कोरोनाची पहिली लाट पार केली आहे. इतर राज्यातही कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. हा एक चिंतेचा विषय आहे, असे मोदी म्हणाले.
11 एप्रिलला ज्योतीबा फुले यांची जंयती आहे. तर 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची जंयती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे चांगली संसाधने आहेत. आपल्याकडे लस देखील आहे. आता आपला जोर मायक्रो कंटेन्ट झोन तयार करण्यावर असला पाहिजे. रात्रीच्या कर्फ्यूऐवजी कोरोना कर्फ्यू हा शब्द वापरा म्हणजे सावधता कायम राहील, असे मोदी म्हणाले.
यापूर्वी आपण लस नसतानाही कोरोनाचा सामना केला होता आणि जिंकलो होतो. आता आपल्याला चाचणीवर भर द्यावा लागेल. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. तरच आपण या संकटावर मात करू. बहुतेक राज्यांमध्ये प्रशासन आळशी दिसत आहे. अशा वेळी कोविडच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत शेवटची बैठक -
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत देशातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत शेवटची बैठक 17 मार्च रोजी झाली होती. यावेळी त्यांनी देशाच्या काही भागात वाढत्या कोरोना प्रकरणांवर चिंता व्यक्त केली होती. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 एप्रिल रोजी देशातील कोरोना आणि लसीकरणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेवत उच्चस्तरीय बैठक घेतली होती.