मलप्पुरम (केरळ) : केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कचरा उचलणाऱ्या महिलांना करोडोंचा जॅकपॉट लागला आहे. स्थानिक नगरपालिकेच्या कचरा वेचणाऱ्या युनिटमधील 11 महिलांनी 10 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. विशेष म्हणजे, या महिलांनी केवळ 250 रुपये भरून लॉटरीचे तिकिट खरेदी केले होते. बुधवारी जेव्हा बातमी आली तेव्हा त्या हिरवे ओव्हरकोट आणि रबरी हातमोजे घालून घराघरातून गोळा केलेला कचरा वेगळा करत होत्या!
मिळून खरेदी केले लॉटरीचे टिकीट : केरळ लॉटरी विभागाने लॉटरीचा निकाल जाहीर केला. या महिलांमध्ये एकट्याने 250 रुपयांचे लॉटरी तिकीट खरेदी करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे त्यांनी मिळून लॉटरीचे टिकीट विकत घेतले होते. लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी येथील महानगरपालिकेच्या गोदामाच्या आवारात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. विजेत्यांपैकी एक राधा म्हणाली की, 'जेव्हा आम्हाला कळले की आम्हाला लॉटरी लागली, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आम्ही सर्वजण जीवनात अडचणींचा सामना करत आहोत. आता हे पैसे काही प्रमाणात आमच्या समस्या सोडवण्यास मदत करतील'.
महिला लॉटरीसाठी पात्र : परप्पनगडी नगरपालिकेने सुरू केलेल्या हरित कर्म सेनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या कामानुसार 7,500 ते 14,000 रुपये पगार मिळतो. हरित कर्म सेना घरे आणि आस्थापनांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा गोळा करते. त्यानंतर तो पुनर्वापरासाठी विविध युनिट्सकडे पाठवला जातो. नगरपालिकेतील हरित कर्म सेनेचे अध्यक्ष शेजा म्हणाले की, या महिला लॉटरीसाठी खऱ्या अर्थाने पात्र आहेत'. ते म्हणाले की, सर्व पुरस्कार विजेत्या खूप मेहनती आहेत. त्या त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात'. त्यांनी सांगितले की, यातील अनेक महिलांना कर्ज फेडावे लागते. मुलींचे लग्न करावे लागते, तसेच आपल्या प्रियजनांच्या उपचाराचा खर्च उचलावा लागतो. ते म्हणाले की, ह्या सर्व अतिशय साध्या घरात राहतात. त्या जीवनातील कठोर वास्तवांना तोंड देत आहेत.
या आधीही जिंकली लॉटरी : विशेष म्हणजे, महिलांनी तिकीट खरेदी करण्यासाठी आपापसात पैसे गोळा करण्याची ही दुसरी वेळ आहे. विजेत्यांपैकी एकीने सांगितले की, 'गेल्या वर्षी अशाच प्रकारे पैसे गोळा करून आम्ही ओणम बंपर खरेदी केले आणि 7,500 रुपये जिंकले. ती रक्कम आम्ही आपापसात समान वाटून घेतली होती.
हेही वाचा :