रायपूर : छत्तीसगडमध्ये दहा नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. बुधवारी सुकमा आणि दांतेवाडा या दोन जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुक्राम आणि काट्टागुडा जंगलांमध्ये ठराविक ठिकाणी काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड (डीआरजी) आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई पार पाडली. पोलिसांचे पथक पाहताच या नक्षलवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना अटक केली.
गंभीर गुन्हे दाखल असलेले नक्षलवादी..
यांपैकी सुकमा जिल्ह्यातून आठ, तर दांतेवाडामधून दोघांना अटक करण्यात आली. सुकमा जिल्हातून अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. हे सर्व जनमिलिशिया संघटना आणि दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनचे (डीएकेएमएस) सदस्य होते. छत्तीसगड विशेष पोलिस सुरक्षा कायदा, २००५ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान १२ इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर्स, १३ जिलेटिन कांड्या, ३५ पेन्सिल सेल, वायर्सचे दोन बंडल, दोन स्विच वायर असे साहित्य जप्त करण्यात आले.
हेही वाचा : जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार; शोधमोहीम सुरू