नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या 52 दिवसांमधील ही एका दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी, 86 लाख, 7 हजार 832 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. गेल्या 24 तासात 23 लाख 97 हजार 191 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 जणांचे लसीकरण झाले आहे.
पहिल्यांदाच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाखांहून खाली आली आहे. सध्या देशात 17 लाख, 93 हजार 645 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांमध्ये 3 हजार 207 कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 3 लाख, 35 हजार 102 वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २ लाख, 31 हजार 456 लोकांनी कोरोनावर मात केल्याचेही मंत्रालयाने सांगितले. आतापर्यंत 2 कोटी, 61 लाख, 79 हजार 85 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतातील कोरोना स्ट्रेन्सची नावे...
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात सर्वात पहिल्यांदा मिळालेल्या कोरोना स्ट्रेनचे नामकरण केले आहे. बी.1.617.1 आणि बी.1.617.2 या दोन स्ट्रेन्सना अनुक्रमे 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं देण्यात आली आहेत. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या नावांसाठी यूनानी लिपीतील अक्षरांची मदत घेतल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले. डब्ल्यूएचओच्या कोविड-19 टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वान केरखोव यांनी ट्विट करत याबाबत सांगितले. या स्ट्रेन्सना सहजपणे ओळखता यावे यासाठी ही नावे ठेवण्यात आली.
एकाच कुटुंबातील आठ जणांनी गमावले प्राण-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला आधीपेक्षा अधिक भीषणता पाहायला मिळाली. पहिल्या लाटेमध्ये एका कुटुंबातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह होत होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये पूर्णच्या पूर्ण कुटुंबेच पॉझिटिव्ह झालेली पाहायला मिळाली. लखनऊमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली. कोरोनामुळे एका महिन्याच्या आतच एका कुटुंबातील आठ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर चांगले उपचार न केल्याचा, आणि वेळेत ऑक्सिजनही उपलब्ध करुन दिला नसल्याचा आरोप केला आहे.