अनधिकृत बांधकामाची पडली भिंत; एका मजुराचा मृत्यू, पाच जण जखमी - भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू
Published : Feb 28, 2024, 7:20 AM IST
पालघर Wall Collapse In Nalasopara : नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा इथल्या चौधरी कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामाची टोलेजंग भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथे ही दुर्घटना घडली. यामुळं अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सदर घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगारा उपसून या जखमी मजुरांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. या दुर्घटनेत कल्पेश नडगे यांचा मृत्यू झालाय. तर शैलेश शिंगडा, रामू मागे, दशरथ लहांगे, भारत दुमडा, जयेश हे जखमी झाल्याची माहिती, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिलीय.
मजुरांना काढले बाहेर : सदर घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या प्रभारी सहायक आयुक्त मनाली शिंदे, अधीक्षक सुभाष जाधव, तलाठी अक्षता गायकर, अग्निशमन दलाचे प्रभारी अग्निशमन अधिकारी किशोर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मलब्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.