कणकवली रेल्वेस्थानक नव्या ‘लुक’मध्ये; नारायण राणेंच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न - Kankavli Railway Station
Published : Aug 9, 2024, 10:49 PM IST
सिंधुदुर्ग Kankavli Railway Station Inauguration : कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली रेल्वे स्थानकानं कात टाकली आहे. रेल्वेस्थानकाला विमानतळाचा लुक आलाय. मागील काही दिवस हे सुशोभीकरणाचं काम सुरू होतं. सार्वजनिक बांधकाम विभागानं कोकण रेल्वे मार्गावरील 12 स्थानकं सुशोभीकरणाचं काम हाती घेतलंय. त्यातील कणकवली स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज (9 ऑगस्ट) संपन्न झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे नारायण राणे, पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी स्थानकाच्या आवारात नव्यानं उभारलेल्या 100 फूटांच्या स्तंभावर राणेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आपल्या जिल्ह्याचा विकास होत असताना रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण व्हावं, ही आनंदाची बाब आहे. मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नारायण राणेंनी दिली. यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासारख्या वेड्याच्या नादी आम्ही का लागावं? असं देखील ते म्हणाले. दरम्यान, ओरोस (सिंधुदुर्ग) आणि सावंतवाडी स्थानकाच्या सुशोभीकरणाचं लोकार्पणदेखील आज पार पडलं.