"बीडचं जे बिहार व्हायला लागले ते थांबावं";अनिल परबांची साई चरणी प्रार्थना,पाहा व्हिडिओ - ANIL PARAB ON BEED
Published : Dec 29, 2024, 5:09 PM IST
शिर्डी : उबाठा नेते अनिल परब यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "मी नेहमीच साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला येत असतो. सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान मिळो, ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. निवडणुका या निवडणुकीसारख्याच असतात, त्यांना निवडणुकीसारखंच सामोरं जावं लागतं. बाबांची शक्ती मिळाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार करू. विरोधकांनी नारा द्यायचा तर देऊ द्या आम्ही लढायचं काम करणार".
बीडमध्ये सुख समाधान शांती राहू देत : साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. त्यामुळं मी राजकीय विषयांवर काहीच बोलणार नाही. साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली की, "बीडचं जे बिहार व्हायला लागले ते थांबावं". बीडमध्ये सुख समाधान शांती राहू द्या अशी प्रार्थना साईबाबांना परब यांनी केली. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीनं अनिल परब यांचा शाल साईमूर्ती देवून सत्कार करण्यात आलाय.