हैदराबाद Vande Bharat Sleeper Train : स्लिपर वंदेभारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर धावणार आहे. बस, ट्रेन किंवा विमान अशा कोणत्याही वाहतुकीच्या साधनांमध्ये प्रवाशांसाठी आंघोळीची सोय नाही, परंतु या ट्रेनमध्ये एसी फर्स्ट क्लासमध्ये गरम पाण्याचा शॉवर दिला जातोय. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी आंघोळ करूनच प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर पडता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा हॉटेलमध्ये होणारा खर्च देखील वाचणार आहे.
ताशी 160 किमी वेगानं धावणार :वंदेभारत स्लिपर कोच ताशी 160 किमी वेगानं धावणार आहे. वंदेभारत स्लिपर कोच बेंगळुरूमधील एका कारखान्यात तयार होतोय. अपघात प्रतिबंधक यंत्रणेमुळं दोन गाड्यांची टक्कर होण्याची यात कमी आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत. स्वच्छतागृहात दुर्गंधी येणार नाही, अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. सामान ठेवण्यासाठी विषेश व्यावस्था करण्यात आल्यानं प्रवाशांना सर्व सामान सोबत नेण्याची गरज भासणार नाही. याशिवाय लोको कॅबमध्येच लोको पायलटसाठी टॉयलेट आहे.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन : भारतीय रेल्वे येत्या दोन महिन्यांत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. मोदी 3.0 मध्ये देखील रेल्वे मंत्रालयाची कमान पुन्हा एकदा अश्विनी वैष्णव यांच्याकडं देण्यात आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेनं सादर केलेली एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे. जी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्याच्या उद्देशानं लवकरच सुरू होणार आहे.
लांब पल्ल्याचा प्रवासासाठी खास : वंदे भारत स्लीपर ट्रेन या राजधानी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा वेगवान मानली जाते. वंदे भारत स्लीपर ट्रेन वेळ आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन चालवल्या जातील. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन खास बनवण्यात आली आहे.
नागपूर-पुणे मार्गावर धावणार? :वंदेभारत स्लिपर कोणत्या मार्गावरून धावणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. ही गाडी काही महिन्यांपूर्वी नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर सोडण्यात यावी, असा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडं पाठवला होता. त्या प्रस्तावावर विचार केल्यास ही ट्रेन या मार्गावर धावताना दिसू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकिटाची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी असेल, असा निर्णय घेतला जाणार आहे.
चाचणीची तयारी जोरात : ही ट्रेन भारतीय रेल्वेचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ज्यामुळं प्रवास केवळ सोयीस्कर होणार नाही, तर प्रवाशांना एक वेळेत पोहचता येणार आहे. या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, हाय स्पीड वाय-फाय, रीडिंग लाइट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील.
ट्रेन दोन महिन्यांत रुळावर येईल : वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या ट्रेनसेटवर काम जोरात सुरू आहे. पहिली ट्रेन दोन महिन्यांत रुळावर येईल. सर्व तांत्रिक काम अंतिम टप्प्यात आहे. हे ट्रेनसेटचं उत्पादन BEML लिमिटेडद्वारे सुरू आहे. बेंगळुरूमधील त्यांच्या रेल्वे युनिटमध्ये तयार कोच तयार केले जाताय. कोचची रचना उच्च दर्जाच्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनविली आहे. ज्यामध्ये क्रॅश बफर आणि कप्लर्सचा समावेश आहे.”
ट्रेनमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर :सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ट्रेनमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जसे की सीसीटीव्ही कॅमेरे, फायर डिटेक्शन सिस्टीम या ट्रेनला आणखी खास बनवते. राजधानी एक्स्प्रेसपेक्षा चांगल्या सुविधांसह येणारी वंदे भारत स्लीपर ही 160 किमी प्रतितास वेग असलेली सेमी-हाय स्पीड ट्रेन असेल. या ट्रेनची ट्रायल ताशी 180 किमी वेगानं घेतली जाणार आहे. BEML द्वारे निर्मित पहिल्या प्रोटोटाइपमध्ये एकूण 16 कोच असतील. ज्यामध्ये 11 AC 3 टियर कोच, 4 AC 2 टियर कोच आणि एक AC फर्स्ट क्लास कोच असेल. तसंच दोन डबे एसएलआर असतील. 16 डब्यांची ट्रेन एकूण 823 प्रवासी वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ज्यामध्ये एसी 3 टायरमध्ये 611 बर्थ, एसी 2 टायरमध्ये 188 बर्थ आणि एसी 1 मध्ये 24 बर्थ आहेत.
हे वाचलंत का :
- Tata Curvv तीन इंजिन पर्यायांसह लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून - Tata Curvv ICE Version Launched
- 'या' ट्रिक्स वापरून करा रेल्वेचं तिकीट बुक, वाचणार बक्कळ पैसे - How to Save Money on Train Tickets