हैदराबाद ISRO new chairman :डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चं नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 14 जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन हे सध्याचे इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील. डॉ. व्ही. नारायणन सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक आहेत. डॉ. एस. सोमनाथ त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी डॉ. व्ही. नारायणन यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली.
इस्रोमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम
डॉ. व्ही. नारायणन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचं संचालक म्हणून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात डॉ. व्ही. नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित करण्यात आले आहेत. डॉ. व्ही. नारायणन हे इस्रोमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सुमारे चार दशके इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्येही तज्ञ
ते रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्येही तज्ञ आहे. त्यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचं प्रकल्प संचालक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, C25 स्टेज यशस्वीरित्या विकसित केले आहेत. यासोबतच डॉ. व्ही. नारायणन यांनी आदित्य, अंतराळयान आणि GSLV Mk-III मोहिमांमध्ये आणि चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मोहिमांमध्येही महत्त्वाचं योगदान दिलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय आहे.