हैदराबाद : BYD (Build Your Dream) या चिनी कार कंपनीनं भारतात BYD eMAX7 इलेक्ट्रिक MPV कार लाँच केली आहे. BYD eMAX7 ची बुकिंग तुम्ही 51 हजारांमध्ये करु शकता. या प्रीमियम व्हेरियंटसाठी 26.90 लाख (7-सीटरसाठी रु 27.50 लाख) आणि ₹ 29.30 लाख (रु. 29.90 लाख) किमत ठेवण्यात आली आहे.
BYD eMAX7 फिचर :चीनच्या आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादक BYD कंपनीनं (बिल्ड युवर ड्रीम) आज अधिकृतपणे नवीन फॅमिली इलेक्ट्रिक कार BYD eMAX7 भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च केली. शक्तिशाली बॅटरी पॅक आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज, या MPV इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 26.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
BYD eMAX7 चे प्रकार :कंपनीनं ही इलेक्ट्रिक कार दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर केली आहे. ज्यांच्या किमती सीटिंग लेआउटनुसार एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. ही कार प्रिमियम आणि सुपीरियर व्हेरियंटमध्ये बाजारात दाखल करण्यात आली आहे. ज्याची किंमत खालीलप्रमाणे आहे.
नवीन BYD eMAX7 :कंपनीनं BYD eMAX7 दोन वेगवेगळ्या सीटिंग लेआउटमध्ये सादर केली आहे. म्हणजे 6-सीटर आणि 7-सीटर पर्याय. त्याचा लुक आणि डिझाइन पारंपारिक मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) सारखं आहे. त्याच्या पुढच्या भागात क्रोम स्ट्रिप्स आणि बोनेटवर क्रीज लाइन्ससह एलईडी हेडलाइट्स आहेत. कंपनीनं ही कार कॉसमॉस ब्लॅक, क्रिस्टल व्हाइट, हार्बर ग्रे आणि क्वार्ट्ज ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. यात ड्रॅगन फेस डिझाइनसह क्रिस्टल डायमंड फ्लोटिंग हेडलाइट आणि 17 इंच अलॉय व्हील आहे.
180 लिटर बूट स्पेस :या कारची लांबी 4 हजार 710 मिमी, रुंदी 1 हजार 820 मिमी, उंची 1 हजार 690 मिमी आणि व्हीलबेस 2 हजार 800 मिमी आहे. 170 मिमीच्या ग्राउंड क्लीयरन्ससह येणारी, ही कार तिसऱ्या रांगेत 180 लिटर बूट स्पेस (लगेज स्पेस) आणि तिसऱ्या रांगेला फोल्ड केल्यानंतर 580 लिटर बूट स्पेस देते.
कशी आहे केबिन :कंपनीनं या कारचे इंटीरियर इतर मॉडेल्सच्या धर्तीवर प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज केलं आहे. यात 1.42 चौरस मीटर क्षेत्रफळाचं पॅनोरामिक सनरूफ आहे. कंपनीनं यात 6-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये कॅप्टन सीट्स दिल्या आहेत. तर 7-सीटर प्रकारात, कॅप्टन सीटसह मध्यभागी बेंच सीटचा पर्याय आहे, जो मध्यभागी हँडरेस्ट आणि कप होल्डर वैशिष्ट्यांसह येतो.
पॉवरट्रेन आणि ड्रायव्हिंग रेंज :BYD eMAX7 मध्ये, कंपनीनं 71.7 kWh क्षमतेचा शक्तिशाली बॅटरी पॅक दिला आहे. जे या कारला एका चार्जमध्ये 530 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. त्याची इलेक्ट्रिक मोटर 94 bhp पॉवर आणि 180 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. ही कार ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे, जी इतर कोणत्याही इलेक्ट्रिक कारपेक्षा जास्त सुरक्षित आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. या बॅटरीनं नेल पेनेट्रेशन चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. नेल पेनिट्रेशन टेस्ट ही बॅटरी सेफ्टी टेस्टिंगच्या क्षेत्रात माउंट एव्हरेस्टसारखी उच्च चाचणी असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
37 मिनिटांत 80 टक्के चार्ज :या इलेक्ट्रिक कारची बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. BYD नुसार, DC फास्ट चार्जरनं केवळ 37 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येणार आहे. या कारचे पिकअप देखील अतिशय उत्कृष्ट आहे. आकारानं मोठी असूनही ही कार अवघ्या 8.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग वाढविण्यास सक्षम आहे.
इतर वैशिष्ट्ये : BYD eMAX7 मध्ये, कंपनीने 12.8 इंच (32.5 cm) रोटेबल इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. ही सिस्टम Android Auto आणि Apple Car-Play कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याशिवाय 3-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, प्रगत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, प्रगत गियर-शिफ्टिंग नॉब सिस्टम, मागील प्रवाशांसाठी मागील एसी व्हेंट्स, NFC कार्ड की, वायरलेस चार्जिंग सिस्टम, कार कनेक्टेड तंत्रज्ञानासारखे फिचर दिले आहेत.
सेफ्टी : कंपनीनं या इलेक्ट्रिक कारमध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. यात 6 एअरबॅग्ज, ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस लेव्हल-2), स्पीड लिमिट अलर्ट, रिअर सेन्सिंग वायपर्स, रिअर कॅमेरा, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (EPB), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल डायनॅमिक कंट्रोल सिस्टीम, हिल होल्ड कंट्रोल (HHC), ब्रेक डिस्क वाइपिंग सिस्टम (BDW) सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. याशिवाय अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्ड, डोअर ओपनिंग वॉर्निंग यांसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
हे वाचलंत का :
- इंस्टाग्रामची सेवा ठप्प, ॲप होतय लॉग आऊट
- मुंबई म्हाडाची सोडत जाहीर, इथं 'पहा' विजेत्यांची यादी
- दिवाळीपूर्वी मोफत गॅस सिलेंडर, उज्ज्वला योजनेसाठी आजच करा अर्ज