मुंबई :बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व इथल्या जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी धमकीचा फोन आला. फोनवरील धमकी देणाऱ्या संशयितानं आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडं पैशाची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेले पैसे न दिल्यास झिशान सिद्दीकी यांच्यासह अभिनेता सलमान खानला ठार मारण्याची धमकी फोन करणाऱ्या संशयित आरोपीनं दिली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी नोएडा इथून धमकी देणाऱ्या गुरफान या संशयिताला अटक केली आहे. त्याला घेऊन पोलीस मुंबईत येत आहेत.
झिशान सिद्दीकी, सलमान खानला ठार करण्याची धमकी :पैशाची मागणी करत जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन निर्मल नगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रं फिरवली. पोलिसांच्या माहितीनुसार, धमकी देणारा सदर फोन नोएडा इथून करण्यात आला. मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्याला नोएडा इथून अटक केली असून, आरोपीनं केवळ मजेसाठी फोन केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपी तरुण 24 वर्षांचा असून त्याला आता मुंबईत आणण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.