ठाणे Omar Abdullah News : जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu-Kashmir) कलम 370 हटवल्यानंतर तिथं महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारनं श्रीनगरच्या विमानतळानजीकच बडगाम येथे अडीच एकर जागा दिली आहे. मात्र, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याला विरोध केलाय. त्यामुळं राज्याभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केल्या जातोय. या पार्श्वभूमीवर आज (24 मार्च) ठाण्यात शिदें गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनादरम्यान वेगळंच चित्र बघायला मिळालं.
नेमकं काय घडलं? : आज ठाण्यातील टेंभी नाका येथे युवासेना अध्यक्ष नितीन लांडगे आणि शिवसेना शिंदे गट प्रवक्ते राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना ओमर अब्दुल्ला यांचा पुतळ्याचं दहन करायचं होतं. मात्र, पोलिसांना तो पुतळा आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर एका कार्यकर्त्यानं पोलिसांच्या हातून तो पुतळा हिसकावून घेत तेथून पळ पाढला. त्यानंतर पोलीस देखील त्याच्या मागे धावू लागले. याचवेळी संतप्त आंदोलक पोलिसांच्या मागे पळू लागले. जवळपास एक किलोमीटर हे सर्व एकमेकांमागे धावत होते. त्यामुळं पुतळ्याच्या मागे पोलीस तर पोलिसांच्या मागे आंदोलक, असं चित्र बघायला मिळालं.