मुंबईSalman Khan Firing Case :14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. गोळीबार प्रकरणी गुजरात राज्यातील भुज येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी हे प्रकरण अद्याप थंडावलेलं दिसत नाहीय. बुधवारी 17 एप्रिल रोजी एक कॅब ड्रायव्हर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर आला. त्यानं लॉरेन्स बिश्नोई कोण आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी तिथं असलेल्या पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईचं नाव ऐकताच कॅब ड्रायव्हरला तात्काळ ताब्यात घेत वांद्रे पोलिस ठाण्यात नेलं.
कॅब बुक करणाऱ्याला अटक :गाझियाबादमधील अज्ञातानं कॅब बुक केली. लॉरेन्स विश्नोईला गॅलेक्सी अपार्टमेंटमधून घेण्यास सांगितलं, असं तपासात समोर आलं. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासानंतर कॅब बुक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील 20 वर्षीय आरोपी रोहित त्यागीला अटक करण्यात आली आहे. त्याची कार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं अभिनेता सलमान खानच्या निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सपासून वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत बुक करण्यात आली होती. त्याला दोन दिवसांसाठी वांद्रे पोलिसांच्या कोठडी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सलमान खान भारतात नसून तो परदेशात गेल्याचं समोर आलं आहे.