नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) या सरत्या वर्षानं काय दिलं किंबहुना त्यांनी काय मिळवलं या सर्व बाबींचा जर विचार केला तर 2024 वर्ष संघाच्या अपेक्षापूर्तीचं वर्ष ठरलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकीय आणि अराजकीय दृष्टीनं देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित परिणाम समाजात दिसत आहे, असं मत संघाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत श्रीपाद कोठे यांनी व्यक्त केलय. तसंच राजकीय दृष्टीनं जर विचार केला तर असं लक्षात येईल की, संघाच्या प्रयत्नांमुळंचं आज 'हिंदुत्व' भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलय, असंही ते म्हणाले.
संघामुळं महाराष्ट्रात हिंदू विचाराची त्सुनामी आली :श्रीपाद कोठे म्हणाले की, "राजकारण हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषय नाही. प्रत्यक्ष राजकारण संघ कधीही करत नाही. मात्र, जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा संघ राजकीय गोष्टींमध्ये आपली भूमिकाही निभावतो आणि याही वेळेला त्यांनी तेच केलय. त्याचे थेट परिणाम आपल्याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. समाज राजकीय स्वरुपात अभिव्यक्त व्हावा यासाठी संघानं सक्रियपणे या निवडणुकीत काम केलं. त्याचाच परिणाम आज दिसतोय. आज महाराष्ट्रात हिंदू विचारांची त्सुनामी आली आहे."
शताब्दी वर्षाच्या निमित्तानं संघाची पंचसूत्री :पुढं त्यांनी सांगितलं, "संघाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीनं अनेक कार्यक्रम सुरूच असतात. त्यांनी आता शताब्दी वर्षाच्या निमित्तानं पंचसूत्री दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही भारतातील एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. जी देशाच्या राष्ट्रीय विचारसरणीला बळ देण्यासाठी आणि समाजात एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहे."
"संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. 2025 मध्ये संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकभराच्या प्रवासात संघानं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात मोठा प्रभाव टाकलाय. संघाची स्थापना परकीय गुलामगिरीच्या काळात भारतीय समाजातील वैचारिक आणि सामाजिक विसंवाद दूर करण्यासाठी झाली. डॉ. हेडगेवार यांचं मत होतं की, भारताच्या प्राचीन परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीला चालना देण्यासाठी देशभर एक सुसंघटित पद्धतीनं काम करणारी संघटना हवी. स्वातंत्र्यपूर्व काळात जातीयतेमुळं आणि परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळं भारतीय समाज कमकुवत झाला होता. संघाचा उद्देश राष्ट्रीय भावना जागृत करणे, भारतीय संस्कृतीचे संरक्षण करणे आणि युवकांमध्ये शारीरिक आणि मानसिक दृढता निर्माण करणे हा होता." काळानुरुप संघात काय बदल झाले, त्यातून भारतीय समाजावर काय परिणाम झाला तसंच पुढे काय करण्यात येईल यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
काळानुरूप स्वीकारले अनेक बदल :
1. प्रारंभीचा कार्यभाग : स्थापनेच्या सुरुवातीला संघानं शाखा पद्धतीद्वारे युवकांना शारीरिक प्रशिक्षण, देशभक्ती आणि शिस्तीचे धडे दिले.
2. स्वातंत्र्यानंतरचा काळ : भारत स्वतंत्र झाल्यानंतर संघानं सामाजिक कार्यावर भर दिला. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी काम करणे हा त्यांचा मुख्य उद्देश बनला.
3. आपत्ती व्यवस्थापन : 1960 च्या दशकानंतर संघानं नैसर्गिक आपत्ती आणि देशावर आलेल्या संकटांमध्ये मदतकार्य सुरू केलं. उदाहरणार्थ, भूकंप, पूर, आणि दंगली यामध्ये संघाचे स्वयंसेवक अग्रेसर राहिले आहेत.
4. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान : विद्या भारती, संस्कार भारती, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ आणि वंचित समाजासाठी चालवलेल्या विविध प्रकल्पांद्वारे संघानं आपले कार्यक्षेत्र विस्तारले.
5. सामाजिक समावेश : काळाच्या ओघात संघानं विविध जाती, धर्म आणि समुदायांमध्ये एकात्मता वाढवण्यासाठी उपक्रम राबवले.