मुंबई Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मोठी कारवाई केलीय. मुख्य आरोपी मिहिर शाहनं कथितरित्या दारू घेतलेल्या जुहूमधील बारचं अनधिकृत बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात आलं. व्हाईस ग्लोबल तपस बार असं कारवाई करण्यात आलेल्या बारचं नाव आहे.
नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई : मुख्य आरोपी मिहिर शाह याने भरधाव वेगानं बीएमडब्ल्यू चालवून दुचाकीला धडक दिल्यानं कावेरी नाखवा (45) यांचा मृत्यू झाला. मिहिर शाहला पोलिसांनी विरारमधून मंगळवारी अटक केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बीएमसीच्या के-पश्चिम प्रभाग कार्यालयाचं पथक आज सकाळी व्हाइस-ग्लोबल तापस बारमध्ये पोहोचलं. त्यांनी बारच्या अनधिकृत असलेल्या बांधकामाचा काही हिस्सा बुलडोझरनं पाडला आहे. नियमांचं उल्लंघन करुन बारचं बांधकाम वाढवण्यात आलं होतं. अनधिकृत बांधकाम पाडण्यापूर्वी बारला नोटीस देण्यात आली होती. यापूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागानं या बारला सील ठोकलं होतं. नियमानुसार दारू पिण्याकरिता परवाना लागतो. त्यासाठी किमान 25 वर्षे वयाची अट आहे. आरोपी मिहिरचे वय 24 वर्षांहून कमी असताना त्याला दारू दिल्यानं बार सील केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. बार चालकानं नियमांचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं.