अमरावती Amravati Wooden Arts : असं म्हणतात विद्यार्थ्यांनी जीवनात एक तरी कला जोपासली पाहिजे. अभ्यासाबरोबरच आपण कला जोपासली तर, पुढे जाऊन आयुष्यात कोणत्याही कारणानं निर्माण झालेली पोकळी कला भरून काढते. याचा प्रत्यय आलाय नैराशात असलेल्या प्रभाकर वानखडे (Prabhakar Wankhade) या सेवानिवृत्त शिक्षकाला. त्यांनी त्यांच्या कलेतून आगळीवेगळी सुरेख काष्ठशिल्पे तयार केली. यातून त्यांनी अनोखी 'लाकूडसृष्टी' निर्माण करून नैराशावर मात केली आहे.
प्रभाकर यांनी कलात्मकतेनं कोरलेल्या लाकडाची सायकल, लाकडाचा पाळणा, लाकडी ब्लेड, लाकडाचा रुपया, लाकडाचा झेंडा, लाकडाचं अशोकचक्र, लाकडाचं कुलूप-किल्ली, दागिने इतकंच काय तर अनेक विद्वान, राजकारणी, वैज्ञानिक यांची स्वाक्षरी अशी गोष्टी लक्ष वेधून घेतात. त्यांच्या घराच्या भिंतीवर लाकडाची दिनदर्शिका, कात्री, सांडशी, चाकू, पुस्तक, पाटी असं सारं काही लाकडाचंच दिसून येतं. जिल्ह्यातील परतवाडा येथे नैराश्यामुळं मोठा पगार असताना देखील या शिक्षकानं सेवानिवृत्ती घेतली. नैराश्यात बुडालेल्या या शिक्षकाला पत्नी आणि मुलांनी मानसिक आधार दिला. यातून लहानपणी त्यांनी जोपासलेल्या कलेला कलाटणी मिळाली. आता अवघ्या दोन वर्षात त्यांनी आगळीवेगळी 'लाकूडसृष्टी' निर्माण केलीय.
असं आहे लाकूड विश्व : लाकडातून आगळीवेगळी कलाकृती निर्माण करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव 'प्रभाकर वानखडे' आहे. परतवाडा शहरातील प्रभाकर वानखडे यांनी आपल्या कलेतून लाकडाचं अनोखं विश्व साकारलय. सांचीचा स्तूप, अशोकचक्र यांसोबतच आरी, कात्री, झाडाच्या खोडावर चढणारी बेडकी, कंगवा, पर्स, भिंतीवर चढणारी पाल, अडकित्ता, ब्रश अशा अनेक गोष्टी त्यांनी लाकडात कोरल्या आहेत.त्यांनी प्रत्येक कलाकृती ही अखंड लाकडात अतिशय छान कोरीव कामाद्वारे साकारली आहे. त्यांचा हा लाकडी साहित्याचा खजिना पाहताना माणूस अगदी थक्क होऊन जातो. खरं सांगायचं तर अतिशय देखणी अशी लाकडाची ही संपूर्ण कलाकृती पाहण्याकरता अख्खा दिवसही अपुरा पडतो.
लाकडात कोरल्या अनेकांच्या स्वाक्षरी : अखंड लाकडामध्ये विविध कलाकृती साकारणं अतिशय अवघड आहे. तरी प्रभाकर वानखडे यांनी अनेक दिग्गजांच्या स्वाक्षरींना लाकडी पाट्यांवर आकार दिला. अगदी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची पाटी त्यांनी तयार केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी आता देशभर प्रसिद्ध झाली आहे. तसंच अनेक थोर पुरुषांच्या स्वाक्षरी देखील आपण लाकडात कोराव्यात या उद्देशाने त्यांनी ते काम हाती घेतलं.
लाकडात कोरली स्वाक्षरी : आज वानखडे यांच्या संग्रहात थोर इंग्रजी साहित्यिक शेक्सपियर, अमेरिकेचा शोध लावणारे कोलंबस अलेक्झांडर कलिंगम, विमानाची निर्मिती करणारे राइट ब्रदर्स, क्रांतिकारक गेव्ह, कार्ल मार्क्स, लेनिन यांच्या लाकडात कोरलेल्या स्वाक्षरी आहेत. त्याचबरोबर लिओनार्दो विंची, अब्राहम लिंकन, लसीकरणाचे जनक लुईस पाश्चर, जॉर्ज बर्नार्ड शॉ, ग्राहम बेल, न्यूटन, थॉमस एडिसन, नेल्सन मंडेला, गॅलेलियो गॅलिली, स्टीफन हॉकिन्स, कारवर यांच्याही स्वाक्षरी त्यांनी लाकडात कोरल्या आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची मराठीतील स्वाक्षरीही त्यांनी कोरली आहे. शहीद भगत सिंग, रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली भाषेतली स्वाक्षरी, मुंशी प्रेमचंद, जगदीश चंद्र बोस, वल्लभ भाई पटेल, सलीम अली, एस रामानुजन, पु. ल. देशपांडे, अशा अनेकांच्या स्वाक्षरी प्रभाकर वानखडे यांनी अखंड लाकडात हुबेहूब कोरल्या आहेत.