मुंबई Womens Day 2024 : लोकल ट्रेन मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. अशात दर रविवारी मेगा ब्लॉकच्या बातम्या आता मुंबईकरांसाठी रोजच्या झाल्या आहेत. रविवारी कोणत्या मार्गावर किती वेळासाठी मेगाब्लॉक आहे? याचा आढावा घेऊनच मुंबईकर रविवारच्या दिवसाची प्लॅनिंग करत असतात. या बातम्या जेव्हा तुमच्यासमोर येतात तेव्हा रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतल्याचं कारण सांगितलं जात. मात्र, हे तांत्रिक काम म्हणजे नेमकं काय? हे फारसं कुणाला माहीत नाही. या कामांमध्ये रेल्वेच्या रुळांची डागडुजी करणे, सिग्नल प्रणाली सुरळीत करणे, या कामांसोबतच आणखी एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे रेल्वे ज्या विजेवर चालते त्याच्या ओव्हर हेड तारांचं जाळं संपूर्ण मुंबईभर पसरल आहे, त्याची डागडुजी करणे इत्यादी काम येतात. हे काम करणारी एक महिला असून तिचं नाव आहे 'अनुपमा सिंग'.
टीममध्ये एकमेव महिला मेकॅनिक : एक काळ असा होता रेल्वे म्हणजे केवळ पुरुषांची मक्तेदारी समजली जायची. मात्र, आज घडीला रेल्वेच्या प्रत्येक विभागात महिला कार्यरत आहेत. यात मध्य रेल्वेच्या टॉवर वॅगनची दुरुस्ती करणाऱ्या अनुपमा सिंग या एकमेव महिला मेकॅनिकल आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अनुपमा यांनी सांगितलं की, "2012 मध्ये मी रेल्वेत भरती झाले. 2018 मध्ये मला टॉवर वॅगन मेकॅनिकल या पदावर बढती देण्यात आली आणि कामाला सुरुवात केली. सध्या मी कुर्ला विभागात कार्यरत असून, टॉवर वॅगन मेकॅनिकलची आमची 18 जणांची टीम आहे. यात मी एकमेव महिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिवा स्थानक या भागात कोणताही बिघाड झाल्यास तिथं टॉवर वॅगन कार घेऊन जाणे आणि तो बिघाड दुरुस्त करणे हे माझं काम आहे."