उन्हाच्या तीव्रतेमुळे झालेल्या महिलेच्या मृत्युविषयी सांगताना ईटीव्ही रिपोर्टर (Reporter) अमरावती Woman Dies Due To Sunstroke :परतवाडा अंजनगाव मार्गावर असणाऱ्या सावली या ठिकाणी प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेनिमित्त रविवारी परतवाडा शहरात कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत सहभागी असणाऱ्या ललिता सुभाष बाळापुरे (58) महिलेचा उन्हाच्या तडाख्यामुळे मृत्यू झाला. या घटनेने कथास्थळी खळबळ उडाली.
उन्हामुळे महिलेला आली भोवळ :प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेनिमित्त रविवारी परतवाडा शहरातून सकाळी साडेसहा वाजता कलश यात्रा काढण्यात आली. पोलिसांनी या कलश यात्रेसाठी साडेदहा वाजेपर्यंत परवानगी दिली होती. असे असताना वाघा माता मंदिर परिसरात दहा वाजल्यापासून ही कलश यात्रा जागेवरच थांबल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली. यावेळी या परिसरातील वाहतूक व्यवस्था देखील खोळंबली. दरम्यान उन्हाचा पारा वाढल्यामुळे कलश यात्रेत सहभागी अनेक महिलांना भोवळ आली. यापैकी ललिता बाळापुरे यांना भोवळ येतात त्या खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कलश यात्रेदरम्यान चांगलीच खळबळ उडाली.
आयोजकांवर कारवाई :शिव महापुराण कथेनिमित्त कलश यात्रा काढण्यासाठी पोलिसांच्यावतीने सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. ही कलश यात्रा सावली या ठिकाणी असणाऱ्या शिव महापुराण कथास्थळापर्यंत दहा वाजेपर्यंत पोहोचायला हवी असताना वाघा माता मंदिर जवळच दहा वाजेपर्यंत ही कलश यात्रा थांबली. यानंतर जवळपास दीड-दोन तास कलश यात्रा एकाच ठिकाणी होती. आयोजकांचे नियोजन चुकल्यामुळे वाहतुकीची तारांबळ उडाली. तसेच कलश यात्रेत सहभागी भाविकांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आयोजकांविरुद्ध कारवाई केली जाणार अशी माहिती परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितली आहे.
कथास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त :परतवाडा अंजनगाव मार्गावर असणाऱ्या सावली येथील शेत शिवारात प्रदीप मिश्रा यांचे शिव महापुराण कथा 6 मे ते 12 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या शिव महापुराण कथेदरम्यान कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील पोलीस शिव महापुराण कथास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
- काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नसीम खान यांना पुन्हा स्थान, काय म्हणाले नसीम खान? - lok sabha election
- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, कोल्हापुरात प्रचाराचा 'सुपर संडे' - Lok Sabha Election 2024
- "पक्ष चिन्हासारखं आमचं ग्राउंडही चोरीला गेलं, पण जनतेने निवडणूक...", रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024