चंद्रपूरVanita Raut amazing assurance : दिवाळीनिमित्त शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो. यात साखर, तेल, रवा, चनाडाळ, मैदा अशा जीवनाश्यक वस्तू दिल्या जातात. मात्र या आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर सामील करणे आवश्यक आहे. मी लोकसभा निवडणुकीत निवडून आले, तर खासदार निधीतून नागरिकांना आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की तसंच बिअर देणार असल्याचं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या महिला उमेदवार वनिता राऊत यांनी म्हटलं आहे. नागरिकांना आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की तसंच बिअरचा मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जाणार असल्याचं देखील वनिता राऊत यांनी म्हटलं आहे.
वनिता राऊत यांच्या अश्वासनाची चर्चा : सध्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा संघात 15 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. यात प्रामुख्यानं काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा समवेश आहे. या प्रमुख पक्षांमध्येच मुख्य लढत होणार आहे. मात्र, अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना अजब अश्वासन दिलंय. त्याच्या अश्वासनाची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवणारे उमेदवार वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा विविध मुद्यांवर निवडणूक लढवतात. तसंच निवडणुकीच्या प्रचारात आश्वासन घेऊन जनतेसमोर मतदान करण्याची विनंती करतात. मात्र, वनिता राऊत एक वेगळाच मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत. 'प्रत्येक व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे. त्यामुळं रेशनच्या दुकानात स्वस्त दरात दारू मिळायला हवी. त्यातही दिवाळीच्या वेळी आनंदाच्या शिधासोबत उच्च दर्जाची व्हिस्की, बिअर शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावी', अशी मागणी वनिता राऊत यांची आहे. या लोकसभा निवडणुकीत मला मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केल्यास माझ्या खासदार निधीचा उपयोग करत आपण व्हिस्की, बिअर उपलब्ध करून देणार असल्याचं वनिता राऊत यांचं म्हणणं आहे.