मुंबई Mohan Bhagwat On Manipur Violence:देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन झालं. मागील 10 वर्षात भाजपा सरकारनं अनेक कामं केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव त्यांनी पोहचलं. आर्थिक वाढ, देशाची प्रतिष्ठा, कला, विज्ञान, संस्कृतीत आपण पुढे जातोय. परंतु गेल्या वर्षापासून मणिपूर धुमसतंय. वर्षभरापासून मणिपूर शांततेच्या प्रतिक्षेत आहे. पण, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित केली जात नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केली. नागपुरात सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग कार्यक्रमाचा समारोप झाला, यावेळी सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते.
सरसंघचालकांचा गर्भित इशारा? :मोदी सरकारची मणिपूरवरुन मोठी नाच्चकी झालीय. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात असताना पंतप्रधान, गृहमंत्री तिकडे फिरकले नाहीत. त्यावेळी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांना धारवेर धरलं होतं. त्यामुळं मोदी सरकार मणिपूरचा प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरलं. मणिपूर शांत करण्यास सरकारनं प्राथमिकता द्याला हवी होती, असा अप्रत्यक्ष गर्भित इशारा मोहन भागवत यांनी मोदी सरकारला दिला आहे. मणिपूरच्या हिंसाचाराबद्दल मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मोदी सरकार मणिपूरचा हिंसाचार हाताळण्यास अपयश का ठरलं?, मोहन भागवत यांच्या वक्तव्याची दखल घेऊन मोदी सरकार मणिपूरचा प्रश्न तात्काळ मार्गाी लावेल का?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत.
मणिपूरचा प्रश्न मार्गी लागू शकतो :मणिपूर मुद्द्यावरुन मोहन भागवतांनी मोदी सरकारचे कान टोचलेय. त्यामुळं आगामी काळात मणिपूरचा मुद्दा केंद्र सरकार गांभीर्यानं घेऊन शांतता प्रस्थापित करणार का?, याबाबत राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलं आहे. आता मणिपूरच्या मुद्द्यावरून संघानं हस्तक्षेप केला आहे. त्यामुळं याचे परिणाम आगामी काळात नक्कीच दिसून येतील. मणिपूरचा प्रश्न सरकार प्राधान्यानं सोडवू शकतं, असं राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी म्हटलं आहे.