मुंबई - Body Dysmorphic Disorder : निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं अलिकडेच दिलेल्या एका खास मुलाखतीत स्वतःच्या बॉडीबद्दल नेहमी एक प्रकारे लज्जीत होत असल्याचा खुलासा केला होता. आपण इतर मुलांप्रमाणे वाढलो नाही, क्रिकेट फुटबॉलसारखे खेळ खेळलो नाही, याबद्दल सतत खंत वाटत राहायची. आपण इतरांहून वेगळं का आहे याची चिंता लागून राहायची हे सांगताना त्यानं बॉडी डिसमॉर्फिया आजाराशी केलेल्या संघर्षांबद्दलचा खुलासाही केला. फेय डिसोझा यांच्याशी झालेल्या मुलाखतीत बोलताना करणने दावा केला की गेल्या काही वर्षांत काहीही बदलले नाही आणि त्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी त्याने मानसिक आरोग्याशी संबंधीत काउन्सीलरची मदतही घेतली आहे. गेल्या दोन वर्षापासून तो याबाबत उपचार घेत आहे.
तो जेव्हा पूलमध्ये जायचा तेव्हा त्याला सतत दडपण राहायचं. आपल्या बॉडीबद्दलचा विचार मनात कायम राहायचा. खूप वजन असल्यामुळं तो मोकळे कपडे घालायचा त्यावरही लोक चिडवत राहतात असं त्याला वाटत असायचं. आपल्या शरीराचा कोणताही भाग लोकांनी पाहून नये याची काळजी तो घ्यायचा. तो म्हणाला की, "लहानपणी मी माझ्या शेजारी राहणाऱ्या किंवा शाळेतील इतर मुलांप्रमाणे नव्हतो. मी खेळ खेळत नव्हतो. मी पुस्तकांमध्ये आणि सिनेमे पाहण्यात रमलेलो असायचो. मी खूप लाजाळू आणि आपल्यातच मग्न असायचो. मला शाळेत जातानाही लाज वाटायची कारण माझं वजन जास्त होतं."
करण जोहरनं ज्याबद्दल सांगितलं तो 'बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर' आजार काय आहे ?
बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर ही एक मानसिक आजाराची अवस्था आहे. ज्यामध्ये आपण स्वतःला समजलेल्या दोषांबद्दल विचार करणं रोखू शकत नाही. हा दोष इतरांना कळत नसला तरी त्याबद्दल स्वतःबद्दल शरम वाटते आणि तुम्ही समजात वावरताना दबलेलं असता.
जेव्हा व्यक्तीला बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असते तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या दिसण्यावर लक्ष केंद्रीत करतो. वारंवार आरशात पाहतो, रोज कित्येक तास स्वतःचाच विचार करत राहतो. तुमच्या दोषाचा वारवार त्रास जाणवल्यानं दैनंदिन जगण्याच्या क्षमतेवरही याचा परिणाम होतो.