मुंबई Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आज निवडणूक होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात रस्सीखेच आहे. असे असले तरी मुंबई शिक्षक मतदार संघात, नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये आपापसात लढत रंगणार आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघ : मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे. तर भाजपकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीचा धर्म न पाळता एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे हे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी नलावडे हे निवडणूक लढवत आहेत. अशाप्रकारे या मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघात एकूण 15 हजार 839 मतदार आहेत.
मुंबई पदवीधर मतदार संघ : मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून किरण शेलार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे. या मतदारसंघात या दोघांमध्ये अतिशय चुरशीची अशी लढत होणार आहे. दोन्ही बाजूंनी सर्व शक्ती पणाला लावली गेली आहे. भाजपाला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघामध्ये एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार आहेत.