छत्रपती संभाजीनगरAurangabad Lok Sabha Result 2024 : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यात मराठवाड्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर सर्व मतदार संघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळं जालना-बीड मतदारसंघांमध्ये भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसंच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागली. या दोन हक्काच्या जागा गेल्यानं जातीय समीकरण आडवं आल्याचं बोललं जात आहे. तर, याच समीकरणाचा फायदा मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव विजयी उमेदवार संदीपान भुमरे यांना झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
आरक्षणाच्या आंदोलनामुळं बदललं समीकरण :गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उठवलेलं रान निकालाच्या समीकरणावर परिणामकारक दिसून आलं. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय नेत्यांना केलेली गाव बंदी, जाहीर कार्यक्रमात नेत्यांना सहभाग न करून घेण्याचं आवाहन, अशा काही गोष्टींमुळं प्रचारावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. तर, दुसरीकडं राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू असताना अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजपा-शिवसेना तसंच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं, काही ठिकाणी वादही झाले. मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर विरोध कोणाचा केला नाही. मात्र ज्याला पाडायचं त्याला पाडा आपल्या विरोधात काम करणाऱ्याला सोडू नका, असं आवाहन देखील केलं होतं. अशा परिस्थितीत मराठा समाज विशेषतः मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाईल, असं समीकरण मांडण्यात आलं. त्याचा परिणाम जालना-बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. त्यामुळंच केंद्रीय मंत्री असताना देखील रावसाहेब दानवे यांना धक्कादायक निकालाला समोर जावं लागलं, तर पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.