महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांचं निधन, राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली - R R BORADE DEATH

मराठीतील अग्रगण्य कथाकार आणि ज्येष्ठ कादंबरीकार रा. रं. बोराडे यांच वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. त्याच्या मृत्यूनंतर साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.

R R Borade passes away
साहित्यिक रा. रं. बोराडे यांचं निधन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 12:05 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - प्रसिद्ध साहित्यिक तथा राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष रा. रं. बोराडे यांचं वृद्धापकाळाने पहाटे चार वाजता निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्यानं साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोनच्या सुमारास कैलास नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे शेतकरी कुटुंबात रा. रं. बोराडे यांचा जन्म झाला. कुटुंबियांच्या पाठिंब्याने त्यांनी उच्चशिक्षण घेतलं. मराठवाडा विद्यापीठात त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 2000 ते 2004 या काळात ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष होते.

साहित्यिक रा. रं. बोराडे यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "मराठी भाषेतील ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार व ग्रामीण साहित्यात आपले आगळे-वेगळे स्थान निर्माण करणारे साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे सर यांचं निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या 'पाचोळा' या कादंबरीने ग्रामीण जीवनाचं वेगळे दर्शन घडविलं. त्यांचे पेरणी, कणसं आणि कडबा, नातीगती, बोळवण, माळरान, राखण, हरिणी हे कथासंग्रह; सावट, आमदार सौभाग्यवती, चारापाणी, रहाट पाळणा आदि काही कादंबऱ्या असे विपुल साहित्य प्रकाशित आहे. त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण जीवनातील बदलती समाजव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या नातेसंबंधांचे नवे आयाम यांसह खेड्यापाड्यातील बहुजन कष्टकरी वर्गाचा सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक संदर्भांचा पट मांडणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, " ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी अस्सल ग्रामीण साहित्याच्या निर्मितीतून त्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैली आपल्या लेखणीद्वारे रसिकांसमोर समर्थपणे उभी केली. त्यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपला आहे. प्राचार्य रा. रं. बोराडे हे ग्रामीण साहित्याचे सशक्त आणि प्रभावी लेखक होते. त्यांच्या लेखणीतून साहित्य रसिकांना ग्रामीण जीवनाचं खरंखुरं चित्र पाहायला मिळालं. ‘पाचोळा’, ‘चारापाणी’, ‘मी आमदार सौभाग्यवती’ यांसारख्या कादंबऱ्यांतून आणि विविध कथासंग्रहांतून त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैलीला जीवंत केलं. मागच्याच आठवड्यात त्यांना राज्य शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता. मात्र, त्या सन्मानाचा स्वीकार करण्याआधीच त्यांचं निधन होणं हे अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनानं प्रतिभावान साहित्यिक आणि कथाकथनकार हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाचोळाकार बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा. रं. बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. बोराडे सरांनी केवळ साहित्यक्षेत्रात नव्हे, तर शिक्षण आणि साहित्यप्रसाराच्या माध्यमातूनही मोठे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी ग्रामीण ग्रंथालयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली असून, त्यांच्या साहित्याच्या रूपाने ते कायम आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो."

ABOUT THE AUTHOR

...view details