मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी ही चर्चा करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 27 तारखेला कोणीही उपस्थित राहणार नाही असं सांगण्यात आलं आहे.
तारीख बदला -या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मला फोन केला. त्यावेळी त्यांनी (दि. 27 फेब्रुवारी रोजी बैठक असल्याचं सांगितलं. मात्र, आम्ही त्यांना कळवलं की 27 तारखेला आम्ही येऊ शकत नाही. कारण वंचित बहुजन आघाडीची पुण्याला जाहीर सभा आहे. त्यावेळी महाराष्ट्राची पूर्ण कमिटी त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जयंत पाटलांना आम्ही विनंती केली आहे की त्यांनी 27 ऐवजी 28 फेब्रुवारी रोजी आपण बैठक घ्यावी.
वंचित बहूजन आघाडी उपस्थित राहू शकणार नाही : जयंत पाटील यांनी इतर सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून 28 ला होते का बैठक ते तपासतो असं सांगितलं आहे असंही आंबेडकर यांनी सांगितलं आहे. परंतु संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की 27 तारखेलाच बैठक होत आहे. मात्र जर 28 तारखेला बैठक होणार असेल, तर आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहू शकतो असंही आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीच्या होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडी उपस्थित राहू शकणार नाही हे स्पष्ट झालं आहे. तसंच, 27 लाच बैठक झाली आणि वंचित त्यामध्ये सहभागी होऊ शकली नाही तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.