अमरावती Uttam Yewale Fine Art:जाड भारी दगडाचा छान टुमदार हत्ती, लाकडाचे घोडे, बैल, लाकडात कोरलेली श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती तसेंच लाकडाचा आगळा-वेगळा कंदील अशा कलाकृती मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या मोठा गाव येथील रहिवासी उत्तम येवले यांनी बनवल्यात. लहानपणी घरची गुरं जंगलात चरायला सोडल्यावर फावल्या वेळेत विरंगुळा म्हणून दगडांना ठोकून त्यांना कोरणे तसंच लाकडांना आकार देऊन कलाकृती निर्माण करण्याची सहज अवगत झालेली कला पुढे कुटुंबाला आर्थिक आधार देणारी ठरली. आपल्या कलाकृतीतून कुटुंबाला आर्थिक बळकटी देणारे उत्तम येवले यांच्या कला गुणांसंदर्भात 'ईटीव्ही भारत' ने जाणून घेतले असता त्यांच्या कलाकृतीचे विविध पैलू समोर आले.
उत्तम येवले त्यांच्या कलाकृतीविषयी माहिती देताना (ETV Bharat Reporter) बालपणी चित्रकलेची आवड :बालपणी शाळेत असताना चित्रकलेशिवाय दुसऱ्या कुठल्याही विषयात आवड नव्हती. चित्रकला फार आवडायची मी छान चित्र काढायचो. पहाड, मोर, हरिण गाई, म्हशी अशी छान चित्रं काढायचो आणि चित्रकला हा विषय मला आवडायला लागला. चित्रकला आवडत असल्यामुळेच तरुणपणी घरच्या गाई, म्हशी जंगलात चालत असताना जंगलातील लाकडांना विविध आकार देण्याचा छंद लागला. लाकडांना आकार देत असतानाच दगडावर दगड ठोकून कलाकृती निर्माण होत असल्याचं लक्षात येताच दगडांची छोटी मूर्ती देखील मी घडवायला लागलो. गाई, म्हशी चारणे, दूध काढणे, दुधाचा व्यवसाय यासोबतच नवीन कला मला अवगत झाली असं उत्तम येवले म्हणतात.
घरातील प्रत्येक वस्तू स्वनिर्मित :घराचा उंबरठा, घराचे दार, घरातले मंदिर, पलंग, बाज, ड्रेसिंग टेबल अशा घरातल्या प्रत्येक सागवान लाकडाच्या वस्तू या मी स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत. आधी मातीच्या जुन्या घरातील सर्व साहित्य आहे. आता नवीन घर बांधताना घराची दारं-खिडक्या मी स्वतः तयार केल्या आणि दारावर कलाकृती देखील मीच कोरली आहे. आमच्या जुन्या घराची खिडकी ही माझी सर्वांत पहिली कलाकृती असल्याचं उत्तम येवले सांगतात.
मंदिरात देवाच्या मूर्तीही घडवल्या :मेळघाटातील अनेक गावांमध्ये मंदिरात देवाच्या मूर्ती मी स्वतः दगडावर कलाकृती करून घडवल्या आहेत. आता काही दिवसांपूर्वी जंगलात हत्ती देवाची दगडाची मूर्ती मी बनवली आहे. आमच्या घरात लाकडाची श्रीकृष्णाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती मी स्वतः तयार केली असल्याचं उत्तम येवले सांगतात.
मुलांसाठी लाकडाची खेळणी :घरात आता नातू आहेत, भावाचीही लहान मुलं आहेत. त्यांच्याकरता लाकडाची अनेक खेळणी तयार केली आहेत. चिमणी, मोर, हरीण, गवे, गाई, बैल अशी खेळणी तयार केली आहेत. यासोबतच लाकडाच्या भल्या मोठ्या हरिणाच्या शिंगांसह असणारे मुखवटे बनवले आहेत. घराच्या भिंतीवर हे मुखवटे हुबेहूब खऱ्या हरणांचे मुखवटे असावेत असा भास घरी येणाऱ्या अनेकांना होतो असं देखील उत्तम येवले यांनी सांगितलं.
दगडाचा हत्ती आणि लाकडाचा कंदील ही खास कलाकृती :उत्तम येवले यांनी आपल्या घराच्या दारांवर कोरलेली कलाकृती घरात येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करते. त्यापेक्षा अधिक त्यांच्या घरात असणारा खास दगडाचा हत्ती लक्ष वेधणारा आहे. चांगला भारी भक्कम वजनाचा हा हत्ती दहा, पंधरा वर्षांपूर्वी दगडात घडवला आहे. लहान मुलांना दुरूनच ह्या हत्तीसोबत खेळावं आणि बोलावं असं वाटतं. वजनदार असणारा हा हत्ती घरात अतिशय सुरक्षित स्थळी ठेवण्यात येतो. येवले यांच्या घरात असणारा लाकडाचा कंदील हा अतिशय सुंदर अशी कलाकृती असून सुमारे 25 ते 30 वर्षे जुन्या अशा या कलाकृतीवर काजळी चढली आहे. असं असलं तरी कंदीलाची आगळीवेगळी कलाकृती उत्तम येवले यांच्या कलागुणांना दाद देणारी आहे.
हेही वाचा:
- समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; स्विफ्ट आणि अर्टिगाची समोरासमोर धडक, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Samruddhi Highway Accident
- NEET पेपर लिक प्रकरण ; चौकशीसाठी सीबीआयचं पथक आज धडकणार लातूरमध्ये - NEET Paper Leak Case
- "प्रज्ञा सातव यांना तिकीट दिलं तर विरोधात काम करू..."; ठाकरे गटाच्या खासदाराचा काँग्रेसला इशारा - Nagesh Patil Ashtikar