मुंबई : आपल्या जादुई तबला वादनानं जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक, संगीतकार, पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसैन यांचं निधन झालंय. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाकीर हुसैन यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येतोय.
राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली :महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उस्ताद जाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. "उस्ताद जाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन झाल्याचं वृत्त भारतीय संगीत विश्वासाठी अत्यंत धक्कादायक आहे. उस्ताद अल्लारखाँ यांचे सुपुत्र जाकीर हुसैन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेलं. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली आणि अद्भूत प्रतिभेमुळं जाकीर हुसैन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अशा दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनानं मंत्रमुग्ध केलं. त्यांचे तबला वादन ऐकून लाखो युवक-युवती तबला वादनाकडं वळले."
तबला वादनाला दिली स्वतंत्र ओळख -"भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबला वादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगीतकार म्हणून आपला अमिट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केलं. त्यांच्या निधनामुळं भारतानं-विशेषतः महाराष्ट्रानं आपला अत्यंत लाडका सुपुत्र आणि संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा गमावलाय", असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय.
कलाविश्वाचा ताल चुकला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत जाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, "भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना, सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद जाकीर हुसैन यांचं जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे. हे नुकसान कधीही भरुन येणारं नाही. त्यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते. उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला."
पॉप संगीतातील तालही आत्मसात - पुढे एकनाथ शिंदे यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, ""कुरेशी घराणं हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखं अढळ होतं. अतिशय साधी राहाणी आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचं पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असं आता म्हणावं लागेल. 'झाले बहु होतील बहु, परंतु, या सम हा…हेच खरे'. अभिजात संगीताबरोबरच पाश्चात्य रॉक आणि पॉप संगीतातील तालही त्यांनी लीलया आत्मसात केले होते. म्हणूनच तीन वेळा त्यांना ग्रॅमी अवॉर्डनंही सन्मानित करण्यात आलं. या प्रतिभावान तालसम्राटाला अखेरचा दंडवत. भावपूर्ण श्रद्धांजली."
कलाविश्वातील एक अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला : "प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद जाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी वेदनादायी आहे. भारतातील सर्वांत प्रसिद्ध तबलावादक अशी ख्याती असलेल्या अल्लारखाँ खान यांचे सुपुत्र असलेले जाकीर हुसैन एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. भारतीय संगीतातील 'तबला' या वाद्याला जगाच्या व्यासपीठावर त्यांनी विराजमान केलं. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारनं त्यांना पद्मश्री, पद्मभूषण सन्मानानं गौरविलं तर जगानं ग्रॅमी पुरस्कार आणि एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह पुरस्कार देऊन त्यांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाची नोंद घेतली. कलाविश्वातील एक अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या कलेला वंदन करुन उस्ताद जाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) शरद पवार म्हणाले आहेत.
अजित पवारांनी व्यक्त केला शोक :उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील उस्ताद जाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले,"हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक उस्ताद जाकीर हुसैन यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी कळली. त्यांच्या निधनामुळं जागतिक आणि भारतीय संगीत क्षेत्रात भरून न निघणारं नुकसान झालंय. मी उस्तादजींच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तस्वकियांच्या दुःखात सहभागी आहे."
कधीही भरून न निघणारी पोकळी-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शोकसंदेशात म्हटलंय की, "सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात अभूतपूर्व असे योगदान असलेले उस्ताद जाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्यानं संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, हीच प्रार्थना."
हेही वाचा -
- तालवाद्याचे 'उस्ताद' हरपले, अमेरिकेत सुरू होते उपचार