महाराष्ट्र

maharashtra

उरण तरुणी हत्याकांड ; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बोलावलं भेटीला, अन् मग तिनं लग्नास नकार देताच निर्घृणपणे भोसकलं - Uran Girl Murder Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 7:13 AM IST

Updated : Aug 1, 2024, 8:01 AM IST

Uran Girl Murder Case : उरण तरुणी हत्याकांडात पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पीडित तरुणीला आरोपी दाऊद शेख यानं फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत भेटीला बोलावलं होतं. त्यानंतर त्यानं तिला लग्न करुन बंगळुरूला जाण्यास तगादा लावला. मात्र तरुणीनं ठाम नकार दिल्यानं दाऊदनं कर्नाटकमधून आणलेल्या चाकूनं तिला भोसकलं.

Uran Girl Murder Case
संपादित छायाचित्र (Reporter)

उरण तरुणी हत्याकांड ; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटीला बोलावलं (Reporter)

नवी मुंबई Uran Girl Murder Case : उरण शहरातील तरुणीची 25 जुलैला एका पेट्रोल पंपाजवळ धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आल्यानं राज्यभर खळबळ उडाली. मारेकरी दाऊद शेख या नराधमाला उरण पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा तालुक्यातील शहापूर हिल इथून 30 जुलैला पहाटे 5 वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन तत्काळ नवी मुंबईला आणून रात्री 11:00 वाजता अटक केली. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केलं असता, त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. तरुणीला फोन करून सतत भेटायला ये असा त्यानं तगादा लावला होता. भेटली नाही तर फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी तो देत होता. त्याच बरोबर माझ्याशी लग्न कर आपण बंगळुरूला जाऊ या त्याच्या मागणीला तरुणीनं ठाम नकार दिल्यानं दाऊद शेखनं तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

आरोपी दाऊद शेख (Reporter)

उरणच्या तरुणीची निर्घृण हत्या :उरणमध्ये तरुणीची हत्या झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. तरुणीला न्याय मिळावा म्हणून संपूर्ण उरण परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. दाऊद शेख या नराधमानंच आमच्या मुलीला मारलं आहे, असा संशय तरुणीच्या आई-वडिलांनी व्यक्त केला. तरुणीचा मारेकरी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं या संदर्भात आरोपीकडं चौकशी सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे त्यानं केले आहेत.

मधात बसलेला आरोपी दाऊद शेख (Reporter)

तरुणी सोबत दाऊदला करायचं होतं लग्न :दाऊद शेख आणि तरुणी उरणमध्ये शाळेत एकत्र होते. काही कालांतरानं त्यांच्यात मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं, असा दावा पोलीस सूत्रांनी केला. 2019 ला जेव्हा तरूणी अल्पवयीन होती त्यावेळी, तिच्यावर अत्याचार केल्यानंतर दाऊद शेखवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्या संदर्भात त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. 2019 नंतरही दाऊद शेख तरूणीला वारंवार भेटायचा प्रयत्न करत होता. आरोपी दाऊद याला तरुणीसोबत लग्न करायचं होतं. तिला घेऊन बंगळुरूला जायचं होतं. तो तरुणीला त्याचा मित्र मोसिन याच्या फोनवरून फोन करून सतत त्रास द्यायचा. "माझ्यासोबत लग्न कर, आपण बंगळुरूला जाऊ," असा तगादा लावत होता, मात्र तरुणी त्याला वारंवार नकार देत होती.

ब्लॅकमेल करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी :पीडित तरुणी आणि दाऊद हे एकाच शाळेत शिकत होते. दाऊदनं मधूनच शाळा सोडून तो ड्रायव्हरचं काम करत होता. शाळा सोडुनही दाऊद तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. दाऊदकडं तरुणीचे काही फोटो होते, जे तो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत असे. हत्येच्या एक दिवस अगोदर 24 जुलैला आणि दाऊद आणि तरूणी एकमेकांना भेटले. त्याने तिचे काही फोटोही फेसबुकवर अपलोड केले होते. 24 जुलैला तरुणीनं त्याची भेट घेतल्यानंतर त्यानं ते फोटो काढून टाकले.

हत्या केलेला चाकू आणला कर्नाटकमधून : "लग्न करुन बंगळुरू इथं जाण्याचा तगादा त्यानं तरुणीसमोर लावला. त्यासाठी तो फोन करून भेटायला ये असा सतत तगादा तिच्यामागं लावत होता. भेटली नाही तर फोटो व्हायरल करायची धमकी देत होता. 25 जुलै रोजी भेटायला बोलवत होता, फोटो व्हायरल करेल, या भितीनं तरुणी त्याला भेटायला गेली. माझ्या बरोबर राहा म्हणून तो पुन्हा तगादा लावू लागला. मात्र तरूणीनं नकार दिल्यानं त्यानं तिची हत्या केली. हत्या करण्यासाठी तो चाकू कर्नाटकातून घेऊन आला. त्यानंतर पनवेल इथून एटीएममधून पैसे काढून कर्नाटक इथं पळून गेला. तरूणीचा मोबाईल पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. आरोपी हत्येनंतर तरूणीचा मोबाईल बरोबर घेवून गेला. खून केल्यानंतर हत्यार कुठं टाकलं याचा तपास सुरू आहे. हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचं सध्या तरी दिसून येत नाही," असं पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं आहे.

गुन्ह्यातील कलमं वाढल्यानं आरोपीची वाटचाल खडतर : आरोपी दाऊद विरोधात तरुणीचा खून करून जीवे ठार मारणं आणि अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत तरुणी ही अनुसूचित जाती - जमातीमधील असल्यानं ठार मारण्यासह आता अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचा समावेश झाला. कलमं वाढल्यानं आरोपीची पुढील वाटचाल खडतर झाली. या गंभीर गुह्याचा पुढील तपास शेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांचे पोलीस पथक करत आहे.

राज्यभरात व्यक्त होत आहे संताप : मागील 5 दिवस उरण, पनवेल नवीमुंबईसह राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे उरण शहरात चिघळलेल्या वातावरणात संतप्त जमावाला शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी दाऊदला 31 जुलैला पहाटेच्या सुमारास तरुणीचा खून केल्याच्या कबुली पुराव्यासह पनवेल इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

  1. उरण तरुणी हत्या प्रकरण : हत्येच्या अगोदर दाऊद करायचा पीडितेचा पाठलाग; सीसीटीव्ही फुटेजमधून झालं उघड - Uran Girl Murder Case
  2. उरण तरुणी हत्याकांड प्रकरण : आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकात ठोकल्या बेड्या - Uran Girl Murder Case
Last Updated : Aug 1, 2024, 8:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details