नवी मुंबई Navi Mumbai Crime : कोणालाही कळू न देता घरीच प्रसुती करण्याचा अट्टाहास एका तरुणीच्या जीवावर बेतला. 18 वर्षीय अविवाहित तरुणीचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरात घडली. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या नवजात बाळाचा देखील मृत्यू झाला. याप्रकरणी नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण? : संबंधित तरुणी ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आपल्या आई आणि भावंडासोबत राहत होती. मे महिन्यात शाळेला सुट्ट्या असल्यानं संबंधित तरुणी तिचे वडील राहत असलेल्या वाशीतील जुहुगाव येथे आई आणि दोन भावंडांसह राहण्यास आली होती. भावंडांची शाळा सुरू झाल्यानं जून महिन्यात मृत तरुणीची आई, लहान भावंडांना घेऊन श्रीवर्धन येथील गावी गेल्या होत्या. मात्र, मृत तरूणी आईसोबत गावी न जाता वडील राहत असलेल्या जुहू गावातील घरी राहत होती. गुरुवारी सकाळी संबंधित तरुणीचे वडील कामावर निघून गेले. घरी मुलगी एकटी असल्यानं वडील नेहमी फोनवरून मुलीची चौकशी करत असायचे. नेहमीप्रमाणे तरुणीच्या वडिलांनी दुपारी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर वडिलांनी पुन्हा एकदा तरुणीला फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संध्याकाळी देखील तरुणीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्यानं वडिलांनी शेजाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं.
बाथरूममध्ये झाली प्रसूती : मुलगी फोन उचलत नसल्यानं वडिलांनी शेजाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावून तिला हाका मारल्या, अनेकवेळा हाका मारूनही तरूणीकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं शेजाऱ्यांनी खिडकीच्या माध्यमातून दरवाजाची कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. घरातील दृश्य पाहून शेजारीही हादरुन गेले. बाथरूममध्ये संबंधित तरुणीची प्रसूती झाली होती आणि तरूणी बेशुद्ध पडली होती. तिचे नवजात बाळ तिच्या दोन्ही पायामध्ये पडले होते. बाळ जिवंत असल्यामुळं शेजाऱ्यांनी या तरुणीला आणि तिच्या बाळाला उपचाराकरिता वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.