भंडारा Lok Sabha Election 2024 :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी साकोली येथे जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाना साधला. अमित शाह यांनी काँग्रेसच्या गरिबी हटाव कार्यक्रमाचा चांगलाच समाचार घेतला. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही गरिबी हटवण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु देशात काहीही बदललं नाही. काँग्रेस फक्त गरिबी हटवण्याचं आश्वासन देत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढल्याचं दाखवून दिलं, असं म्हणत शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकत शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच त्यांनी भाजपाला 400 हून अधिक जागा जिंकवून देण्याचं जनतेला आवाहन केलं. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपानं विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली.
बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न : बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वात न्याय्य संविधान दिलं आहे. ज्यामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. आज काँग्रेस घरोघरी जाऊन बाबासाहेबांच्या नावानं मते मागत आहे, पण याच काँग्रेसनं 1954 मध्ये बाबासाहेबांच्या विरोधात आघाडी उघडून बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. याच काँग्रेसनं पाच दशके राज्य करूनही बाबासाहेबांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला नाही, तर भाजपानं बाबासाहेबांशी निगडित पाच तीर्थक्षेत्रांचा सन्मान करून त्यांना युगानुयुगे अमर केलं. भाजपानं 400 जागा जिंकल्या तर, आरक्षण संपुष्टात येईल, असं खोटं बोलून काँग्रेस जनतेत संभ्रम पसरवत आहे. मात्र, सत्य वेगळं आहे. भाजपाकडं दोन टर्मसाठी पूर्ण बहुमत आहे, परंतु भाजपानं आपलं पूर्ण बहुमत आरक्षणासाठी नाही, तर कलम 370, तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी वापरलं आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष राजकारणात आहे, तोपर्यंत भाजपा आरक्षण हटवणार नाही तसंच कोणालाही काढू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी जनतेचे प्रत्येक मत उपयोगी पडेल, असं अमित शाह म्हणाले.
काँग्रेसचं राम मंदिरावरून राजकारण : नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत. पण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष काश्मीर आणि देशातील इतर राज्यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करतात. पण भंडारा गोंदियासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण काश्मीरसाठी आपल्या प्राणाची आहुती देऊ शकतो, हे खर्गे यांना माहीत नाही. काँग्रेसनं राम मंदिराच्या मुद्द्यावर वर्षानुवर्षे राजकारण केलं, पण भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींनी जानेवारी 2024 मध्ये रामलल्लाचा अभिषेक करून भव्य मंदिर उभारलं. येत्या 17 तारखेला, 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, भगवान राम त्यांचा जन्मदिवस भव्य मंदिरात साजरा करणार आहेत, असं अमित शाह म्हणाले.
काँग्रेसकाळात दहशतवाद वाढला : राम मंदिराव्यतिरिक्त, नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर, बद्रीनाथ, केदारनाथ, सोमनाथ मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं आहे. मोदींनी भारतातील सर्व सांस्कृतिक वारसा जतन करून देशाला सुरक्षित आणि समृद्ध बनवलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशात दररोज दहशतवादी हल्ले होत होते. तेव्हा काँग्रेस कोणतीही कारवाई करू शकली नव्हती, परंतु नरेंद्र मोदी यांनी उरी, पुलवामाला अवघ्या 10 दिवसांत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल, हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. भाजपा सरकारनं महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, बिहार, झारखंडमधूनही नक्षलवाद संपवला आहे. मोदींचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यास छत्तीसगडमधूनही नक्षलवादाचा नायनाट होईल, ही मोदींची हमी आहे, असं शाह म्हणाले.
कॉंग्रेसचं गरिबी हटवण्याचं वचन विश्वासार्ह नाही :काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, राहुल गांधींनी त्यांच्या जाहीरनाम्यात गरिबी हटवण्याचं वचन दिलं आहे, जे विश्वासार्ह नाही. काँग्रेस पक्ष गेल्या तीन पिढ्यांपासून गरिबी हटवण्याचं आश्वासन देत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी हे देखील आपल्या कार्यकाळात गरिबी हटवू शकले नाहीत. मात्र, मोदींनी देशातील 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्यावर उचलण्याचं काम केलं. भारतीय जनता पक्षानं पंतप्रधानांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली 80 कोटी लोकांना दरमहा प्रति व्यक्ती मोफत रेशन दिलं आहे. मोदी सरकारनं उज्ज्वला योजनेअंतर्गत 12 कोटींहून अधिक घरांमध्ये शौचालये बांधली आहेत, 4 कोटी लोकांना घरे दिली, 10 कोटींहून अधिक माता-भगिनींना गॅस कनेक्शन दिलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात आणखी 3 कोटी घरे बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासोबतच पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं काम पुढील 5 वर्षात केलं जाईल. काँग्रेसच्या कार्यकाळात शेतकरी कल्याणाचा अर्थसंकल्प 22 हजार कोटींचा होता. मोदी सरकारनं हा अर्थसंकल्प 1 लाख 25 हजार कोटींचा केला आहे.