मुंबई Unemployment Rate Increased :एकीकडे देशात बेरोजगारी कमी झाली असून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असताना दुसरीकडं मात्र बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आलंय. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बेरोजगारीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जारी केलेल्या आकडेवारीनुसार 20 ते 34 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
बेरोजगारी दर 43 टक्क्यांहून 45 टक्क्यांवर :सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ही संस्था देशातील अर्थव्यवस्था, जीडीपी तसंच बेरोजगारीबाबत आकडेवारी जाहीर करत असते. त्याचप्रमाणे 2023 ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत 2022 च्या तुलनेत देशात एकूण बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी बेरोजगारीचं प्रमाण 43 टक्के होतं. तर यावर्षी बेरोजगारी 45 टक्क्यावर गेली आहे. मागील तीन महिन्यात तीन टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे, असं संस्थेनं म्हटलंय.
20 ते 34 वयोगटामध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 34 वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. 2023 च्या तुलनेत 2022 मध्ये बेरोजगारी दोन टक्क्यांनी कमी होती. मात्र, 2023 च्या शेवटच्या तीन महिन्यात बेरोजगारी 45 टक्क्यांवर पोहोचली आहे.
देशभरामध्ये रोजगारीचे भाजप मोठे आकडे सांगत आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. रोजगारनिर्मिती झाली नसून, भाजपाच्या काळात मोठी बेरोजगारी वाढली आहे. फक्त रोजगारनिर्मितीचे आकडे वाढवून, फुगवून सांगितले जाताहेत. ही आकडेवारी फेकाफेकीची आहे- महेश तपासे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)