महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छंद माझा वेगळा! आतापर्यंत तब्बल सुमारे 4 लाख स्टॅम्प्स, 80 हजार पोस्टकार्डांचा 'या' अवलियानं केलाय संग्रह - Umesh Jadhav Story - UMESH JADHAV STORY

Umesh Jadhav Story : हा छंद जीवाला लावी पिसे... आपण जोपासलेल्या छंदासाठी तहान-भूक विसरणारे, पदरमोड करणारे, भटकंती करणाऱ्या अनेक 'छंदमग्न' व्यक्ती आपल्या आसपास वावरत असतात. एरवी सर्वसामान्य भासणाऱ्या या माणसांना त्यांनी जोपासलेले छंद असामान्यत्वाच्या काठाशी नेऊन बसवतात. आज आपण माहिती घेणार आहोत सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे झेप घेऊ पाहणाऱ्या एका छंदवेड्याची. या महाशयांचा छंद बघून भलेभले हैराण झालेत. यांना छंद तरी किती गोष्टींचा! पोस्टाची तिकीटं, जुन्या कलात्मक वस्तू, विविध पुस्तकं, जगप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेली चित्रांवरची अनेक पुस्तकं या सर्व वस्तू जमा करण्याचा छंद हे गृहस्थ गेली अनेक वर्ष जोपासत आहेत.

Umesh Jadhav
जोपासणारा मुंबईचा अवलिया उमेश जाधव

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 9:31 PM IST

Updated : Apr 10, 2024, 10:20 AM IST

मुंबईच्या उमेश जाधव यांनी केलाय 80 हजार पोस्टकार्डांचा संग्रह

मुंबई Umesh Jadhav Story : प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. अनेकजण लहानपणी आवडीनं विविध छंदाकडं आकर्षित होतात. परंतु, हे छंद वाढत्या वयानुसार आयुष्यभर फार कमी लोकांची साथ-सोबत करतात. असाच आपल्या लहानपणापासून एक नव्हे तर विविध छंद जोपासणारे मुंबईतील उमेश जाधव नावाचे 'अवलिया' आहेत. आता त्यांच्या या छंदाकडून इतरांनीही प्रेरणा घ्यावी, यासाठी उमेश जाधव धडपडत आहेत. उमेश जाधव यांना पोस्टाची तिकीटं, जुन्या कलात्मक वस्तू, विविध पुस्तकं, जगप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेली चित्रांवरची अनेक पुस्तकं या सर्व वस्तू जमा करण्याचा छंद त्यांनी 50 वर्षांहून अधिक काळ जपला आहे. आतापर्यंत त्यांच्या संग्रही तब्बल चार लाखांहून अधिक पोस्टेज स्टॅम्पस आहेत.



पाहताक्षणी नजरेत भरणारा विविधरंगी संग्रह : मुंबई उपनगरातील कांदिवली पूर्व येथील समता नगर भागातल्या 'सरोवा' कॉम्प्लेक्समध्ये उमेश जाधव राहतात. त्यांच्या घरात पाऊल टाकताच समोरील दृश्य बघून संमोहित व्हायला होतं. सर्वत्र पुस्तकांचा ढिगारा, विविध कलात्मक वस्तूंचा संग्रह! हा मुख्य दरवाजापासून ते आतल्या खोलीपर्यंत सगळीकडे हेच दृश्य पाहायला मिळतं. घराच्या प्रत्येक खोलीत अक्षरशः सावकाश पाय टाकत चालावं लागतं. तिकीटं, पोस्ट कार्ड, जुन्या वस्तू जमा करण्याचा छंद तर अनेकांना असतो. पण असे एक दोन नाही तर अनेक विविध छंद उमेश जाधव यांना लहान वयापासून जडले आहेत. विविध पिक्चर पोस्ट कार्ड, देश विदेशातील सुमारे 80 हजार पेक्षा जास्त पोस्ट कार्ड उमेश जाधव यांच्या संग्रही आहेत.

अनेक पुस्तकांचा संग्रह: अनेक महत्त्वाची पुस्तकं, कलात्मक मूर्ती, आकर्षक आकारातील अत्तराच्या बाटल्यांसह अनेक शहरं, देवस्थानं यांचे कृष्णधवल फोटो, फाउंटन पेन, मनगटी घड्याळं, जुन्या पेंटिंगच्या फ्रेम्स, सिनेमा बुकलेटस्, भगवान गौतम बुद्धाच्या 150 हून जास्त मुर्ती अशा विविध वस्तूंचा दर्जेदार संग्रह त्याच्याकडे आहे. विशेष म्हणजे जाधव यांनी संग्रह करताना फक्त एकाच विषयाला धरून ठेवला नाही. पोस्ट कार्ड, कलात्मक वस्तू, जगप्रसिद्ध चित्रकारांनी काढलेल्या चित्रांवरची विविध पुस्तके त्यामध्ये रवी वर्मा, रेनेर, एम एफ हुसेन, अमृता शेरगील, पिकासो यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. तब्बल 8 हजार पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील आणि दुबईतील प्रसिद्ध ब्रँडच्या अत्तराच्या आणि कलोनच्या विविध आकाराच्या रंगाच्या बाटल्यांचा देखणा संग्रह नजरेत भरणारा आहे.



पहिला पोस्टेज स्टॅम्प स्वित्झरर्लॅडचा : 65 वर्षीय उमेश जाधव यांना वयाच्या 15 व्या वर्षापासून पोस्टेज स्टॅम्प जमा करायची सवय लागली. सुरुवातीला उमेश यांचे वर्गमित्र त्यांच्याकडं पोस्टेज स्टॅम्प मागायचे. उमेश यांचे मित्र मंडळी, नातेवाईक प्रायव्हेट ऑफिसमध्ये कामाला असल्याकारणानं त्यांच्याकडून पोस्टेज स्टॅम्प घेऊन मित्रांना ते द्यायचे. पण इतके सुरेख स्टॅम्प मित्रांना देताना उमेश स्वतः त्या पोस्टेज स्टॅम्पच्या प्रेमात पडले. मित्र मंडळी आणि नातेवाईकांकडून भेट म्हणून मिळणारे स्टॅम्प ते स्वतः जमा करू लागले. त्यांच्याकडं स्वित्झरलँडचा पहिला पोस्टेज स्टॅम्प आला. तेव्हा स्वित्झरलँडऐवजी त्याच्यावर हेल्वेटिया असं लिहिलेलं असायचं. उमेश यांनी तेव्हापासून हा छंद जोपासला. त्यानंतर पुढे 1979 ला त्यांना नोकरी लागली. उमेश यांचा पगार जसजसा पगार वाढू लागला तसतसा त्यांचा स्टॅम्पवरील खर्चही वाढू लागला. त्यानंतर ते स्टॅम्प सोसायटीमध्ये सदस्य झाले. याचा त्यांना स्टॅंपबद्दल माहिती मिळवण्यासाठी बराच फायदा झाला.

सायन्स सेंटरमध्ये भरवलं प्रदर्शन: उमेश जाधव यांचा आवडीचा विषय भूगोल असल्याकारणानं त्यांनी नकाशांचं कलेक्शन सुरू केलं. याबाबत त्यांनी 500 ते 800 स्टॅम्प्स जमा केले. नंतर या स्टॅम्प्सचं मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये त्यांनी प्रदर्शन भरवलं. या प्रदर्शनाकरिता त्यांना ब्राँझ मेडल सुद्धा मिळालं. त्यानंतर त्यांचा प्रवास आतापर्यंत थांबला नाही. ते देशभरात अशा पद्धतीचे प्रदर्शन आयोजित करू लागले. आतापर्यंत उमेश जाधव यांनी राष्ट्रीय स्तरावर 1 गोल्ड, 5 सिल्वर आणि 7 ब्राँझ मेडल्स पटकावली आहेत.



पिक्चर पोस्ट कार्ड मध्ये भारतात नंबर एक : इंटरनेट पूर्व काळात पिक्चर पोस्टकार्डला फार मोठं महत्त्व होतं. धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं, नद्या, शहर, वैशिष्ट्यपूर्ण इमारती, जागा अशा अनेक गोष्टी या पिक्चर पोस्टकार्डच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होत्या. उमेश जाधव सांगतात की, "मुकुंद नावाचे कलेक्टर लंडनमधून मुंबईत आले. त्यांनी मुंबईतील सावरकर प्रतिष्ठानमध्ये पिक्चर पोस्टकार्डचं प्रदर्शन भरवलं होतं. त्या पिक्चर पोस्ट कार्डमध्ये संपूर्ण भारत देशाची माहिती देण्यात आली होती." ते प्रदर्शन पाहून उमेश जाधव इतके प्रभावित झाले की, त्यांनी दुसऱ्याच दिवशी पिक्चर पोस्टकार्ड जमा करायला सुरुवात केली.

700 हून अधिक पिक्चर पोस्टकार्ड : फिल्म मार्केट, चोर बाजार, तसेच डीलक्सच्या मागे लागून त्यांच्याकडून पिक्चर पोस्टकार्ड ते जमा करू लागले. ते सुद्धा विंटेज पिक्चर पोस्टकार्ड म्हणजेच, 100 वर्षांपूर्वी अगोदरचे ज्यामध्ये भारताची संस्कृती, परंपरा, वेशभूषा, मुंबईचं कल्चर, ओल्ड बॉम्बे कलेक्शन असं त्यांच्याकडं 700 हून अधिक पिक्चर पोस्टकार्ड आहेत. त्याचसोबत भगवान गौतम बुद्धांचे सुद्धा 500 पेक्षा अधिक पिक्चर पोस्टकार्ड त्यांच्याकडं आहेत. पिक्चर पोस्टकार्ड कलेक्शनमध्ये उमेश जाधव हे भारतात 'एक नंबर' आहेत.



उमेश जाधव यांच्या साथीला त्यांचा परिवार: छंद जोपासणारे उमेश जाधव यांना या छंदापोटी जमा केलेले स्टॅम्प्स, पोस्टकार्डस्, पेंटिंग्ज, पुस्तकं आदींची मौल्यवान संपत्ती पुढे जतन करण्याचा जास्त ताण नाही. तरुण मुलांना ते याकरता प्रोत्साहित करत आहेत. मुलांना या छंदाची आवड असेल तर त्यांनी तो जोपासावा. याकरता ते मुलांना मोफत स्टॅम्प देतात. त्याचबरोबर या छंदासाठी जी होतकरू मुलं आहेत त्यांना पुढे प्रदर्शन कसं भरवता येईल, यासाठीचं मार्गदर्शन करतात. त्यांची मुलगी सृष्टीही सुद्धा या कामात त्यांना मदत करते. त्यांनी सृष्टीला यासाठी प्रोत्साहित केलंय. मुलगी सृष्टीही हा अमाप संग्रह पुढे जतन करणार आहे. त्यांच्या पत्नी सुनीता या देखील उमेश जाधव यांना मदत करतात. कारण मुंबईतील त्यांच्या राहत्या घरामध्ये असलेला हा मौल्यवान ठेवा जतन करणं तितकं सोपं नाही. त्यामुळं जाधव यांचा विविध रंगी छंदांचा संग्रह एक हेरिटेज असून, तो पुढे जतन झाल्यास त्याचा युवा पिढीला नक्की उपयोग होणार आहे.

हेही वाचा -

  1. 35 प्रकारच्या शेवंतीनं बहरलं घरचं अंगण; रोज चार तास बागकाम करून सेवानिवृत्त डॉक्टर जपतात 'छंद फुलांचा'
  2. Joshi Nursery Story Melghat: एका पंक्चर काढणाऱ्याने मेळघाटात फुलवली दुर्मीळ औषधी रोपांची नर्सरी
  3. Himanshu Rauthan Journey : हिमाचलमधील अवलिया पर्यटक; पदभ्रमंती करत गाठतोय १२०० किमीचा खडतर प्रवास
Last Updated : Apr 10, 2024, 10:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details