सोलापूर:उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. यामधील सहा प्रवास करणारे धरणात बुडाले आहेत. त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक होते. त्यांनी बोट उलटल्यानंतर धाडसाने पोहत धरणाचा काठ गाठून जीव वाचवला. बोटमधील वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्यानं ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे
दोन चिमुकल्यांसह चार जण बुडाले-उजनी धरणात बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं आश्चर्यकारकरित्या प्राण वाचले. त्यांनी बोट धरणात बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रशासन बोटमधील प्रवाशांचा मंगळवारी सायंकाळपासून उजनी धरणात शोध घेत आहेत. गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.